उच्च याजकांनी स्तेफनला विचारले, “ह्या गोष्टी खऱ्या आहेत काय?” त्याने उत्तर दिले, “बंधुजनहो व वडीलजनांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हा हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले, ‘आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात तू जा’. म्हणून तो खासद्यांच्या देशातून निघून हारान येथे जाऊन राहिला. त्याचा पिता निधन पावल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले. त्यात देवाने त्याला वतन दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही. त्याला मूलबाळ नव्हते, तरी हा देश त्याच्या व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे अभिवचन मात्र देवाने त्याला दिले. देवाने आणखी असे सांगितले की, ‘त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि तेथील लोक त्यांना दास करून चारशे वर्षे छळतील. ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्या राष्ट्राचा मी न्याय करीन’, असे देवाने सांगितले आणि ‘त्यानंतर ते तेथून बाहेर पडतील व ह्या ठिकाणी माझी उपासना करतील.’ नंतर देवाने त्याला सुंतेचा विधी कराराचे चिन्ह म्हणून नेमून दिला, हा करार झाल्यानंतर अब्राहामला इसहाक झाला. त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली. मग इसहाकने याकोब ह्या त्याच्या मुलाची सुंता केली व याकोबने त्याच्या बारा पुत्रांची - जे कुलपती झाले - त्यांची सुंता केली. याकोबच्या मुलांनी त्यांचा भाऊ योसेफ ह्याला मिसर देशात विकून टाकले पण त्याच्याबरोबर देव होता. त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडविले आणि मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने सभ्यता व सुज्ञता यांनी संपन्न केले. त्यामुळे त्याने त्याला मिसर देशावर व राजघराण्यावर व्यवस्थापक म्हणून नेमले. मग मिसर व कनान या देशांत सर्वत्र दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबने त्याच्या मुलांना म्हणजेच तुमच्या आमच्या पूर्वजांना पहिल्या सफरीवर पाठविले. मग दुसऱ्या सफरीच्या वेळी योसेफने आपल्या भावांना ओळख दिली. त्यामुळे योसेफचे कूळ फारो राजाला कळले. योसेफने आपला बाप याकोब व आपले सगळे नातलग - सर्व मिळून पंचाहत्तर माणसे - ह्यांना बोलावून घेतले. ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला आणि तेथे तो मरण पावला व आपले पूर्वजही तेथे मरण पावले. त्यांना शखेम या स्थळी नेण्यात आले आणि जी कबर अब्राहामने तिथे हमोराच्या पुत्राकडून रोख रक्कम देऊन विकत घेतली होती, तीत त्यांना पुरले.
प्रेषितांचे कार्य 7 वाचा
ऐका प्रेषितांचे कार्य 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांचे कार्य 7:1-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ