ते लोकांबरोबर बोलत असता काही याजक, मंदिराच्या रक्षकांचा अधिकारी व सदूकी हे तेथे आले. हे लोक संतप्त झाले होते कारण पेत्र व योहान लोकांना शिकवण देऊन, येशूद्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे, असे उघडपणे सांगत होते. म्हणून त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवले. वचन ऐकणाऱ्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला. अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत वाढत गेली.
दुसऱ्या दिवशी यहुदी अधिकारी, वडीलजन व शास्त्री यरुशलेम नगरात एकत्र जमले. त्यांनी उच्च याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व उच्च याजकाचे कुटुंबीय ह्यांची भेट घेतली. ह्या सर्वांनी प्रेषितांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?”
तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो, लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल, तर तुम्हां सर्वांना व सर्व इस्राएली लोकांना हे समजायला हवे की, ज्याला तुम्ही क्रुसावर चढवून मारले व ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य पूर्णपणे बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला, तो हाच येशू आहे. तारण फक्त त्याच्याद्वारेच होऊ शकते; पृथ्वीवर मर्त्य मानवांत ज्याच्याद्वारे आपले तारण होऊ शकेल असा दुसरा कोणीही नाही.”
पेत्राचे व योहानचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी आहेत, हे जाणून न्यायसभेच्या सदस्यांना आश्चर्य वाटले. हे येशूच्या सहवासात होते, हेही त्यांनी ओळखले. मात्र बऱ्या झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना त्यांच्याविरुद्ध काही बोलता येईना. मग त्यांनी प्रेषितांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगून ते आपसात विचार करून म्हणाले, “ह्या माणसांचे आपण काय करावे? त्यांच्याकडून खरोखर असामान्य चमत्कार घडला आहे, हे सर्व यरुशलेमवासियांना कळून चुकले आहे आणि ते आपणाला नाकारता येत नाही. परंतु ही गोष्ट लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद देऊ की, ह्यापुढे लोकांपैकी कोणाबरोबरही तुम्ही येशूच्या नावाने बोलू नये.”
त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, “येशूच्या नावाने मुळीच बोलू नका अथवा शिकवूही नका.” परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले, “देवाच्याऐवजी तुमचे ऐकावे, हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले त्याविषयी न बोलणे, हे आम्हांला शक्य नाही.” त्यांनी त्यांना पुन्हा अधिक कडक ताकीद देऊन सोडून दिले, त्यांना शिक्षा कशी करावी, हे लोकांच्या भयामुळे त्यांना सुचेना. घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक देवाचा गौरव करत होते. बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसाच्या बाबतीत घडला तो माणूस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.
पेत्र व योहान ह्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या मित्रमंडळींकडे गेले. मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांनी त्यांना जे सांगितले होते ते सर्व त्यांनी त्यांना कथन केले. ते ऐकून श्रद्धावंत एकत्रितपणे देवाकडे प्रार्थना करीत म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यांत जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले:
राष्ट्रे का खवळली
व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या?
प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध
पृथ्वीचे राजे उभे राहिले
व अधिकारी जमले.
कारण ज्याला तू अभिषिक्त केलेस तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्याविरुद्ध ह्या शहरात यहुदीतर लोक व इस्राएली लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे खरोखर एकत्र झाले आहेत. जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी नियोजित केले होते ते त्यांनी पूर्ण करावे.