त्याच्या प्रकट होण्यापूर्वी, योहानने पुढे येऊन पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा सर्व इस्रायली लोकांमध्ये केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा काढावयासही मी पात्र नाही, असा कोणी माझ्या मागून येत आहे.’
अहो बंधुजनहो, अब्राहामच्या वंशांतील पुत्रांनो व देवाचे भय बाळगणाऱ्या यहुदीतरांनो, आपल्याला ह्या तारणाचे वर्तमान पाठवलेले आहे! कारण यरुशलेमवासीयांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी येशूला न ओळखता आणि दर साबाथ दिवशी वाचून दाखविण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून त्यांनी संदेष्ट्यांचे शब्द पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा, अशी विनंती त्यांनी पिलातला केली. त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरून खाली काढून कबरीमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मरणातून उठवले. त्याच्याबरोबर जे गालीलहून यरुशलेम येथे आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे, ते आता इस्राएली लोकांसाठी त्याचे साक्षीदार आहेत. आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते, त्याचे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून त्याचे वचन आपल्याकरता पूर्ण केले आहे. दुसऱ्या स्तोत्रात असे लिहिले आहे,
तू माझा पुत्र आहेस,
आज मी तुला जन्म दिला आहे.
शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले, ह्याविषयी त्याने असे म्हटले आहे,
दावीदला जे वचन दिले होते त्यानुसार मी तुम्हांला पवित्र व निश्चित
असा आशीर्वाद देईन.
म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो,
तू आपल्या पवित्र सेवकाला
कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
कारण दावीद त्याच्या स्वतःच्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून निधन पावला आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याचा मृतदेह कुजला. परंतु ज्याला देवाने उठवले तो कुजला नाही. म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असावे की, ह्याच्याद्वारे तुमच्या पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. ज्याविषयी मोशेच्या नियमशास्रानुसार तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्यांच्या ग्रंथात जे सांगितले आहे ते तुमच्यावर ओढवेल,
अहो उपहास करणाऱ्यांनो,
पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा,
कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो,
ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला
कोणी स्पष्टीकरण देऊन सांगितले तरी
तुम्ही विश्वास ठेवणार नाही.
पौल व बर्णबा बाहेर जात असता लोकांनी विनंती केली, “आम्हांला पुढल्या साबाथ दिवशी ह्याविषयी अधिक ऐकायला आवडेल.” सभा संपल्यावर यहुदी लोकांमधील व परिवर्तित यहुदी मतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्या मागे गेले. त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्याकरिता त्यांना प्रोत्साहन दिले.
पुढच्या साबाथ दिवशी जवळ जवळ सर्व नगर, देवाचे वचन ऐकावयाला जमले. पण लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. परंतु पौल आणि बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगणे अगत्याचे होते, तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांस शाश्वत जीवनाकरता अयोग्य ठरवता, त्याअर्थी आम्ही यहुदीतरांकडे वळतो; कारण प्रभूने आम्हांला अशी आज्ञा दिली आहे,
मी तुला यहुदीतरांसाठी प्रकाश
असे करून ठेवले आहे.
ह्यासाठी की, सर्व जगाचे तारण व्हावे.”
हे ऐकून यहुदीतर आनंदित झाले, त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला आणि जितके शाश्वत जीवनासाठी निवडलेले होते, तितक्यांनी विश्वास ठेवला.
प्रभूचे वचन त्या सर्व प्रदेशात पसरत गेले. यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील प्रतिष्ठित पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या प्रदेशाबाहेर घालवून लावले. प्रेषित त्यांचा विरोध दर्शवीत पायांची धूळ झटकून तेथून इकुन्य येथे गेले. अंत्युखियामधील श्रद्धावंत आनंदाने व पवित्र आत्म्याने भरून गेले.