YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जख. 12

12
यरूशलेमेचा भावी उद्धार
1इस्राएलाबद्दल परमेश्वराचे वचन: ज्याने आकाश विस्तारले आणि पृथ्वीचे पाये घातले, जो मनुष्याच्या आत त्यांच्या आत्म्याची निर्मिती करतो, तो परमेश्वर म्हणतो: 2“पाहा! मी यरूशलेमेला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांना गुंगी आणणारा प्याला बनवीन. यरूशलेमेला वेढतील तेव्हा यहूदाचेही तसेच होईल. 3त्या दिवसात मी यरूशलेमेला सर्व राष्ट्रांसाठी एक प्रचंड मोठ्या दगडाप्रमाणे करीन, तो त्या सर्वांना भारी होईल. जो त्या दगडाला उचलण्याचा प्रयत्न करील, तो स्वत:च जखमी होईल आणि जगातील सर्व राष्ट्रे यरूशलेमेच्या विरुध्द लढावयास एकत्र येतील.”
4“पण, त्या दिवसामध्ये, मी घोड्याला भीतीने बिथरवीन आणि त्यामुळे प्रत्येक घोडेस्वाराचा गोंधळ उडेल. मी माझी कृपामय दृष्टी यहूदाच्या घराण्याकडे लावीन आणि मी शत्रूच्या प्रत्येक घोड्यांला अंधळे करीन, असे परमेश्वर म्हणतो. 5मग यहूदाचे पुढारी आपापल्या मनात विचार करतील, ‘यरूशलेमेतील राहणारे रहिवासी त्यांचा देव सैन्यांचा परमेश्वर, याच्या ठायी माझे सामर्थ्य असे आहेत.’
6त्या दिवसामध्ये मी यहूदाच्या पुढाऱ्यांना लाकडांमधील आगीप्रमाणे बनवीन. वणव्यात उभे पीक जसे भस्मसात होते, तसे ते त्यांच्या सभोवतीच्या सर्व शत्रूंचा नाश करतील. यरूशलेमवासी पुन्हा आपल्या स्वतःच्या पूर्वीच्या जागी वसतील.”
7परमेश्वर, प्रथम, यहूदाच्या तंबूंना वाचवील म्हणजे यरूशलेमेमधील राहणाऱ्यांचे आणि दावीदाच्या घराण्यातील लोकांचे गौरव यहूदापेक्षा मोठे होणार नाही. 8त्या दिवशी, परमेश्वर यरूशलेमेतील रहिवाश्यांना वाचवील; त्यातील जो अतिदुर्बल मनुष्यसुध्दा दावीदासारखा वीर बनेल आणि दावीदाचे घराणे देवासमान होईल म्हणजे ते परमेश्वराच्या दूताप्रमाणे पुढे चालणारे होतील. 9परमेश्वर म्हणतो, त्यादिवशी, यरूशलेमेशी युध्द करण्यास आलेल्या राष्ट्रांना नाश करण्याचा मी निर्धार करीन. 10“मी दावीदाच्या घराण्यात आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकात करुणेचा व दयेचा आत्मा ओतीन. ज्यांनी ‘एका’ ला भोसकले, तेच माझ्याकडे बघतील, आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दु:ख होते, तेवढेच दु:ख त्यांना होईल. 11त्यावेळी यरूशलेमेची शोककळा मगिद्दोनच्या सपाट भूमीत हदाद्रिम्मोनाच्या मृत्यूसमयी झालेल्या आक्रोशासारखी असेल.
12देश विलाप करील, प्रत्येक कुटुंब वेगवेगळे होतील, आक्रोश करतील. दावीदाच्या कुळातील पुरुष एकीकडे, तर त्यांच्या स्त्रिया दुसरीकडे आक्रंदन करतील. नाथानाचे घराणे व त्यांच्या बायकादेखील वेगवेगळा विलाप करतील. 13लेवी घराण्यातील पुरुष व स्त्रिया वेगवेगळा शोक करतील. शिमी घराण्यातील पुरुष व स्त्रिया वेगवेगळा शोक करतील. 14आणि इतर सर्व कुळांतले लोक व त्यांच्या स्त्रिया स्वतंत्रपणे शोक करतील.”

सध्या निवडलेले:

जख. 12: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन