YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 22

22
दुःखाची आरोळी आणि स्तुतीगीत
प्रमुख गायकासाठी अय्येलेथ हाश्शहर (म्हणजे पहाटेची हरिणी) या रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.
1माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास?
मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस?
2माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस,
आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही.
3तरी तू पवित्र आहेस,
जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस.
4आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा,
त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.
5देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले,
त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही.
6परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही,
जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे.
7सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात;
ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात.
8ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो,
तर परमेश्वर त्यास सोडवो.
त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.”
9परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस,
मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले.
10मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो.
माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस.
11माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे.
आणि मला मदत करायला कोणीही नाही.
12खुप बैलांनी मला वेढले आहे,
बाशानाच्या बळकट बैलांनी मला वेढले आहे.
13जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो,
तसे त्यांनी आपले तोंड माझ्या विरूद्ध उघडले आहे.
14मी पाण्यासारखा ओतला जात आहे,
आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत.
माझे हृदय मेणासारखे झाले आहे.
जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे.
15फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे.
माझी जीभ टाळूला चिकटली आहे.
तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे.
16“कुत्री” मला वेढून आहेत,
मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे.
त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे.
17मी माझी सर्व हाडे मोजू शकतो.
ते माझ्याकडे टक लावून बघतात.
18त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत,
आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्‌या टाकतात.
19परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तुच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.
20परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव,
माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव.
21सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर.
जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.
22परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन.
सभेत मी तुझे गुणगान गाईन.
23जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा!
याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या!
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
24कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही.
आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही.
जेव्हा पिडीतांनी त्यास आरोळी केली, त्याने ऐकले.
25परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करीन.
तुझे भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडीन.
26गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील.
जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील.
तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो.
27सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील.
सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील.
28कारण राज्य परमेश्वरचे आहे,
तो जगावर अधिकार करणारा आहे.
29पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील.
जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत,
ते त्यास नमन करतील.
30येणारी पिढी त्याची सेवा करणार.
ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील.
31ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 22: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन