YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 118:14-29

स्तोत्र. 118:14-29 IRVMAR

परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे. उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन. परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही. माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन. हे परमेश्वराचे दार आहे; नितीमान त्यातून प्रवेश करतील. मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे आणि तू माझे तारण झाला आहेस. इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, तोच कोनाशिला झाला आहे. परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; ह्यात आपण आनंद व उल्लास करू. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो; परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो. परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे; यज्ञाचा पशू वेदीच्या शिंगास दोरीने बांधा. तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन. तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन. अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.