गण. 32
32
रऊबेन, गाद व अर्धे मनश्शेचे घराणे यार्देनेच्या पूर्वेस वस्ती करतात
1रऊबेन आणि गाद या घराण्यांकडे गुरांढोरांची खूप खिल्लारे होते. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गुरांढोरांसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले. 2म्हणून रऊबेन व गाद यांच्या घराण्यातील लोक मोशेकडे आले. ते मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी यांच्याशी बोलले. 3अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन.
4ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने जी जमीन जिंकली ती गुरांढोरांसाठी खूप चांगली आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत. 5जर आम्हावर तुझी कृपादृष्टी असेल तर तो प्रदेश आम्हास वतन करून देण्यात यावा. आम्हास यार्देन नदीच्या पलिकडे नेऊ नको.
6रऊबेन आणि गादच्या घराण्यातील लोकांस मोशे म्हणाला, तुमचे भाऊबंद लढाईस जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार का? 7जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांस दिला आहे तेथे उतरून जाण्याकरता त्यांचे मन का निरूत्साहित करीत आहात?
8तुमच्या वाडवडिलांनी हीच गोष्ट माझ्याबाबतीत केली होती. कादेश-बर्ण्याला मी काही हेरांना जमीन बघण्यासाठी पाठवले. 9ते लोक अष्कोल खोऱ्यापर्यंत गेले. त्यांनी जमीन बघितली आणि त्या लोकांनी इस्राएल लोकांस परमेश्वराने दिलेल्या प्रदेशात जाण्याच्या इच्छेपासून परावृत केले.
10परमेश्वर त्या लोकांवर खूप रागावला. त्याने शपथ घेतली आणि म्हणाला, 11मिसर देशातून आलेल्या वीस वर्षांवरील कोणत्याही मनुष्यास हा प्रदेश बघू दिला जाणार नाही. मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते. त्यांना मी ही जमीन द्यायचे कबूल केले होते. परंतु त्यांनी मला मनापासून अनुसरले नाही. म्हणून त्यांना हा प्रदेश मिळणार नाही. 12फक्त कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मनापासून परमेश्वरास अनुसरले.
13परमेश्वर इस्राएल लोकांवर खूप रागावला होता. परमेशवराच्यादृष्टीने त्यांनी वाईट कृत्ये केली त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्यांना चाळीस वर्षे रानात भटकावयास लावले. 14आणि आता तुमच्या वाडवडिलांनी जी गोष्ट केली तीच तुम्ही करीत आहात. पाप्यांनो परमेश्वराने त्याच्या इस्राएल लोकांवर आणखी रागवावे अशी तुमची इच्छा आहे का? 15जर तुम्ही परमेश्वराची भक्ति करायचे सोडले तर परमेश्वर इस्राएल लोकांस अधिक काळ रानात ठेवील आणि नंतर तुम्ही त्या सर्व लोकांचा नाश कराल.
16पण रऊबेनाच्या आणि गादच्या घराण्यातील लोक मोशेकडे गेले. ते म्हणाले, आम्ही या जागेवर आमच्या मुलांसाठी शहरे आणि आमच्या जनावरांसाठी गोठे उभारू. 17त्यामुळे आमची मुले याठिकाणी वस्ती करणाऱ्या इतर लोकांपासून सुरक्षित राहतील. पण आम्ही इस्राएलाच्या इतर लोकांस मदत करण्यासाठी आनंदाने येऊ. आम्ही त्यांना त्यांच्या प्रदेशात आणू.
18इस्राएलातील प्रत्येकाला त्याचे वतन मिळाल्याशिवाय आम्ही परतणार नाही. 19यार्देनेच्या अलीकडे पूर्वेस आम्हास आमचे वतन प्राप्त झाले म्हणून आम्ही यार्देनेच्या पलीकडे व पुढे त्यांच्याबरोबर वतन घेणार नाही.
20तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर हा प्रदेश तुमचा होईल. परंतु तुमच्या सैनिकांनी परमेश्वरासमोर लढाईत उतरले पाहिजे. 21आणि तो आपणापुढून आपले शत्रू वतनातून घालवीन आणि देश परमेश्वरापुढे हस्तगत होईल तुमच्या सैन्याने यार्देन नदी पार करून शत्रू सैन्याला या प्रदेशातून हाकलले पाहीजे. 22आणि तर तो देश त्याच्या ताब्यात आल्यावर तुम्ही परत याल. नंतर परमेश्वराकडे आणि इस्राएलाकडे तुम्ही निरपराधी असाल. तर हा देश परमेश्वरापुढे तुमचे वतन असा होईल.
23पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरूद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास शासन होईल याची खात्री बाळगा. 24तुमच्या मुलांसाठी शहरे वसवा आणि जनावरांसाठी गोठे बांधा. पण तुम्ही वचन दिल्याप्रमाणे सारे काही करा. 25नंतर रऊबेन आणि गादच्या कुटुंबातील लोक मोशेला म्हणाले, आम्ही तुझे नोकर आहोत. तू आमचा मालक आहेस म्हणून तू जे सांगतोस ते आम्ही करु.
26आमच्या स्त्रिया, मुले, शेरडेमेंढरे आणि सर्व गुरेढोरे गिलाद शहरात राहतील. 27पण आम्ही, तुझे नोकर यार्देन नदी पार करु. आम्ही परमेश्वरापुढे लढाईस जाऊ. जसे आमचा धनी सांगत आहे.
28याप्रमाणे त्यांनी वचन दिले. ते मोशे, याजक एलाजार, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलचे सर्व वंशाचे प्रमुख या सर्वांनी ते ऐकले. 29मोशे त्यांना म्हणाला, गाद आणि रऊबेनचे लोक यार्देन नदी पार करतील. ते लढाईत परमेश्वराच्यापुढे चालतील. ते तुम्हास प्रदेश जिंकायला मदत करतील आणि तुम्ही गिलादाचा प्रदेश त्यांच्या वाटेचा भाग म्हणून द्याल. 30पण ते तुमच्या सैन्याबरोबर जाण्यात अपयशी ठरले तर कनानमध्ये तुमच्यामध्ये त्यांना वतन मिळेल.
31गाद आणि रऊबेनच्या लोकांनी उत्तर दिले व म्हणाले, “आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन देतो.” 32आम्ही स्वतः सशस्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ. पण आमचे वतन यार्देन नदीच्या पूर्वेला असावे.
33तेव्हा मोशेने गादाचे वंशज, रऊबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे याचा अर्धा वंश अमोऱ्याचा राजा सीहोन याच्या राज्याचा व बाशानाचा राजा ओग याच्या राज्याचा देश दिला. देश, नगरे व त्यामध्ये आजुबाजूच्या प्रदेशातील नगरे दिली.
34गादच्या लोकांनी दीबोन, अटारोथ, अरोएर, 35अटारोथ-शोफान, याजेर यागबहा, 36बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले.
37रऊबेनच्या लोकांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम. 38नबो व बाल-मौन आणि सिब्मा ही शहरे वसवली. त्यांनी पुन्हा वसवलेल्या शहरांना जुनीच नावे दिली. पण नेबो आणि बाल-मोनचे नांव त्यांनी बदलले. 39माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादाला गेले माखीर मनश्शेचा मुलगा होता. त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या अमोरी लोकांस घालवले.
40मोशेने गिलाद मनश्शेच्या कुटुंबातील माखीराला दिले. म्हणून त्याचे कुटुंब तेथे राहिले. 41मनश्शेच्या कुटुंबातील याईर याने छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्यांना याईराची शहरे#हव्वोथ याईर असे म्हटले. 42नोबाहाने कनाथ व त्याच्या आसपासच्या छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्या जागेला आपले नाव दिले.
सध्या निवडलेले:
गण. 32: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.