YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहे. 5:1-13

नहे. 5:1-13 IRVMAR

तेव्हा मनुष्यांनी आणि त्यांच्या बायकांनी आपल्या यहूदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “मुले व मुलींसहीत आम्ही बरेचजण आहोत. आम्हास खायला मिळावे आणि आम्ही जिवंत रहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.” काहीजण म्हणत होते “दुष्काळ असताना धान्यासाठी आम्हास आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.” काही असे सुद्धा म्हणत, “आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावरीला राजाचा कर भरण्यासाठी आम्हास पैसे उसने घ्यावे लागत आहेत. आमच्या बांधवाचे व आमचे रक्तमांस एकच आहे आणि त्यांच्या अपत्यांसारखीच आमची अपत्ये आहेत. तरीसुद्धा आम्हांला आमची अपत्ये गुलाम म्हणून विकावी लागत आहेत. काहींना तर आपल्या कन्यांना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय्य आहोत कारण आमची शेती आणि द्राक्षमळे आता इतर लोकांच्या मालकीचे आहेत.” जेव्हा मी त्यांच्या या तक्रारी आणि त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा मला अतिशय संताप आला. मग मी यावर विचार करून मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, “तुम्ही आपल्या बंधूकडून व्याज घेत आहात” मग मी सर्व लोकांस सभेमध्ये एकत्र बोलावले आणि त्यांना मी म्हणालो, “आपले यहूदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!” ते लोक गप्प राहिले आणि त्यांना काही बोलायला जागा उरली नाही. मी असेही म्हणालो, “तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. जी राष्ट्रे आमचे वैरी आहेत त्यांची निंदा टाळण्यासाठी तुम्ही देवाविषयी भय बाळगून चालावे की नाही? तसेच मी, माझे सेवक, माझे भाऊ त्यांस पैसे आणि धान्य उधार देत आहोत. पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे. त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतूनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना याच दिवशी परत करा. त्यांच्याकडून टक्केवारीने घेतलेले पैसे, धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल जे तुम्ही कर्जाऊ दिलेत ते तुम्ही त्यांना परत करा.” मग ते म्हणाले “त्यांच्याकडून घेतलेले सर्वकाही आम्ही परत करू व अधिक काही मागणार नाही. आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार वागू.” मग मी याजकांना बोलावून घेतले आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे मी त्यांना शपथ घ्यावयास लावली. मग मी आपला पदर झटकून म्हणालो, “आपले वचन जो पाळणार नाही त्यास देव त्यांना त्यांच्या घरातून आणि मालमत्तेपासून झटकून टाकील. तो मनुष्य सर्वस्वाला मुकेल.” ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.