नहे. 3
3
दुरुस्ती करायच्या विभागांची वाटणी
1मग मुख्य याजक एल्याशीब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्याजागी बसवले. हमेआ बुरुजापर्यंत आणि हनानेल बुरुजापर्यंत ती त्यांनी पवित्र केली. 2त्यानंतर यरीहोच्या लोकांनी बांधले आणि त्यानंतर इम्रीचा पुत्र जक्कूर याने बांधकाम केले.
3हस्सनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली. तुळया घातल्या व दरवाजे बसवले, या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले. 4हक्कोस उरीयाचा पुत्र मरेमोथ याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडूजी केली. उरीया हा हक्कोस याचा पुत्र. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. बरेख्या मशेजबेलचा पुत्र बानाचा पुत्र सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली. 5तकोवाच्या लोकांनी भिंतीच्या त्यापुढच्या भागाची डागडूजी केली, पण तकोवाच्या नेत्यांनी मात्र आपला राज्यपाल नहेम्या याच्यासाठी काम करायला नकार दिला.
6यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा पुत्र आणि मशुल्लाम बसोदयाचा पुत्र. यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजागऱ्यांनी जोडले, नंतर कड्या व अडसर बसवले. 7गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे काम केले. गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले. गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेकडील भागाच्या अधिकाऱ्याच्या सत्तेखाली होता.
8हरह याचा पुत्र उज्जियेल याने पुढच्या भागाची डागडुजी केली, उज्जियेल सोनार होता आणि हनन्या हा सुगंधी द्रव्ये करणाऱ्यांपैकी होता. या लोकांनी रुंद कोटापर्यंत यरूशलेमेची मजबुती केली. 9हूरचा पुत्र रफाया याने भिंतीचा पुढील भाग बांधून काढला. यरूशलेमेच्या अर्ध्या भागाचा हा राज्यपाल होता. 10हरूमफाचा पुत्र यदाया याने भिंतीच्या पुढच्या भागाचे काम केले. आपल्या स्वत:च्या घरालगतच्या भिंतीची डागडुजी त्याने केली. त्याच्या पुढचा भाग हशबन्याचा पुत्र हत्तूश याने डागडुजी केली.
11हारीमचा पुत्र मल्कीया आणि पहथ-मवाबचा पुत्र हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली तसेच भट्टी बुरुज ही बांधला. 12हल्लोहेशचा पुत्र शल्लूम याने त्यापुढचा भाग दुरुस्त केला. या कामात त्याच्या कन्यांनी त्यास मदत केली. शल्लूम यरूशलेमेच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता.
13हानून नावाचा एकजण आणि जानोहा येथे राहणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागाऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. त्यांनी उकिरडा वेशीपर्यंत एक हजार हात लांबीची दुरुस्ती केली.
14रेखाबाचा पुत्र मल्कीया याने ही उकिरड्याची वेस बांधली, मल्कीया बेथ-हक्करेम या जिल्ह्याचा राज्यपाल होता. त्याने वेस दुरुस्त केली आणि दरवाजे बिजागऱ्यांसह लावले, या दरवाजांना कड्या, अडसर घातले.
15मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी कोलहोजेचा पुत्र शल्लून याने झरावेशीची डागडुजी याने केली. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले आणि वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या शेलह तळयाची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरण्याच्या जिन्यापर्यंत त्याने डागडुजी केली.
16अजबूकचा पुत्र नहेम्या याने पुढचा भाग दुरुस्त केला. नहेम्या बेथ-सूरच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी होता. दावीदाच्या कबरेसमोरच्या भागापर्यंत त्याने डागडुजी केली. तसेच बांधून काढलेला तलाव आणि वीरगृह इथपर्यंत त्याने काम केले. 17लेवी घराण्यातील लोकांनी पुढचे काम केले. बानीचा पुत्र रहूम याच्या हाताखाली या लोकांनी काम केले. हशब्याने पुढच्या भागाची डागडुजी केली. नहेम्या कईला जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने आपल्या जिल्ह्यातर्फे दुरुस्त्या केल्या. 18त्याच्या भावांनी हेनादादचा पुत्र बवाई#बिन्नुई, कईलाच्या अर्ध्या भागाचा अधिकारी व भाऊबंधानी डागडुजी केली. 19नंतर येशूवाचा पुत्र एजेर याने पुढचे दुरुस्तीचे काम पार पाडले. एजेर मिस्पाचा राज्यपाल होता. शस्त्रागारापासून भिंतीच्या कोपऱ्यापर्यंतच्या भिंतदुरुस्तीचे काम त्याने केले.
20जब्बईचा पुत्र बारुख याने पुढची दुरुस्ती केली. बारुखने खूप मेहनत घेऊन कोपऱ्यापासून पुढे एल्याशीबाच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंतचे काम केले. एल्याशीब हा मुख्य याजक होता. 21हक्कोसचा पुत्र उरीया. उरीयाचा पुत्र मरेमोथ याने एल्याशीबाच्या घराच्या दारापासून सरळ घराच्या शेवटपर्यंत भिंतीचे काम केले.
22भिंतीच्या पुढच्या भागाची दुरुस्ती यरूशलेमभोवती राहणाऱ्या याजकांनी केली. 23बन्यामीन आणि हश्शूब यांनी आपापल्या घरासमोरील भिंत दुरुस्त केली अनन्याचा पुत्र मासेया. मासेयाचा पुत्र अजऱ्या. याने आपल्या घरालगतच्या भिंतीचे दुरुस्तीचे काम केले. 24हेनादादचा पुत्र बिन्नुई #बवाईयाने अजऱ्याच्या घरापासून, भिंतीचे वळण आणि पुढचा कोपरा येथपर्यंतचे काम केले.
25उजई याचा पुत्र पलाल याने बुरजालगतच्या भिंतीच्या वळणापासूनची दुरुस्ती केली. हा बुरुज राजाच्या वरच्या घराजवळ होता. म्हणजेच राजाच्या पहारेकऱ्यांच्या चौकालगत होता. त्यानंतर परोशाचा पुत्र पदाय याने दुरुस्ती केली. 26ओफेल टेकडीवर राहणारे मंदिराचे सेवेकरी (नथीमीम) यांनी जलवेशीच्या पूर्वेपर्यंत आणि तिच्या नजीकच्या बुरुजापर्यंतचे भिंतदुरुस्तीचे काम केले. 27पुढे तकोवाच्या लोकांनी मोठ्या बुरुजापासून ते सरळ ओफेल टेकडीपर्यंतचा उरलेला भाग दुरुस्त केला.
28घोडा वेशीवरचा भाग याजकांनी दुरुस्त केला. प्रत्येक याजकाने आपापल्या घरापुढच्या भागाची दुरुस्ती केली. 29इम्मेराचा पुत्र सादोक याने आपल्या घरापुढच्या भिंतीची डागडुजी केली. शखन्याचा पुत्र शमाया याने पुढचा भाग दुरुस्त केला. शमाया हा पूर्ववेशीचा राखणदार होता. 30शलेम्याचा पुत्र हनन्या याने आणि सालफचा सहावा पुत्र हानून याने भिंतीची पुढची दुरुस्ती केली. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने आपल्या घरापुढची भिंत दुरुस्त केली.
31मंदिराचे सेवेकरी आणि व्यापारी यांच्या घरापर्यंतच्या भिंतीच्या भागाची दुरुस्ती सोनारांपैकी मल्कीया याने केली. हा भाग तपासणी वेशीसमोर येतो. भिंतीच्या कोपऱ्यावरील खोलीपर्यंतच्या भिंतीची दुरुस्ती मल्कीयाने केली. 32कोपऱ्यावरील खोली आणि मेंढरांची वेस यांच्या दरम्यानच्या भिंतीची दुरुस्ती सोनार आणि व्यापारी यांनी केली.
सध्या निवडलेले:
नहे. 3: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.