पुन्हा येशू सरोवराच्या किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो सरोवरातील एका तारवात जाऊन बसला आणि सर्व लोक सरोवरकिनारी जमिनीवर होते. तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि तो त्यांना म्हणाला; “ऐका, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला; आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले. पण सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्यास काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगवले, मोठे झाले व त्यास पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.” तो म्हणाला, “ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
तो एकांती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्यास दाखल्यांविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हास दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते.
यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे परंतु त्यांना दिसू नये,
आणि ऐकत असता त्यांनी ऐकावे, पण समजू नये.
नाही तर कदाचित त्यांची माने फिरतील आणि देव त्यांना क्षमा करील.”
तो म्हणाला, “हा दाखला तुम्हास समजला नाही काय, तर मग इतर बाकीचे दाखले तुम्हास कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते थोडा काळच टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात, परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून त्याचा स्वीकार करतात मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”