YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 3:1-19

मार्क 3:1-19 IRVMAR

मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा.” नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” पण ते गप्प राहीले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात लांब कर,” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्यास जीवे मारणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करीत बसले. मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला. यरूशलेम शहर, इदोम प्रांत, यार्देने नदीच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सिदोन शहराच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला. मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते. जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!” पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका. मग येशू डोंगरावर चढून गेला व त्यास जे शिष्य हवे होते? त्यांना त्याने स्वतःकडे बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली त्यांना त्याने प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्यासोबत असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्यास पाठवता यावे. व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा. मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्यास पेत्र हे नाव दिले. जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान त्यांना त्याने बोआनेर्गेश, ज्याचा अर्थ गर्जनेचे पुत्र असा होतो हे नाव दिले. अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.