YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 15:1-26

मार्क 15:1-26 IRVMAR

पहाट होताच मुख्य याजक लोक, वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले. पिलाताने त्यास विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, “तू म्हणतोस तसेच.” मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले. मग पिलाताने त्यास पुन्हा प्रश्न विचारला, तू उत्तर देणार नाहीस काय? पाहा, ते कितीतरी गोष्टींविषयी तुझ्यावर आरोप करत आहेत! पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले. वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्यास पिलात रिवाजाप्रमाणे लोकांसाठी सोडत असे. बरब्बा नावाचा एक मनुष्य, बंडखोरांबरोबर तुरुंगात होता. त्याने दंगलीमध्ये खून केल्याबद्दल त्यास पकडण्यात आले होते. लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले. पिलाताने विचारले, तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? पिलात असे म्हणाला कारण त्यास माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते. परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांस चिथवले. परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते पुन्हा मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! पिलाताने पुन्हा विचारले, का? त्याने कोणता गुन्हा केला आहे? ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! पिलाताला लोकांस खूश करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले. शिपायांनी येशूला राज्यपालाच्या वाड्यात, प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलावली. त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झगा घातला व काटयाचा मुकुट करून त्यास घातला. ते त्यास मुजरा करू लागले आणि म्हणू लागले, यहूद्यांच्या राजाचा जयजयकार असो. त्यांनी वेताच्या काठीने वारंवार त्याच्या डोक्यावर मारले. त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यास वंदन केले. त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्याच्या अंगावरून जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वतःचे कपडे त्यास घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्यास बाहेर घेऊन गेले. वाटेत त्यांना कुरेनेकर शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता होता व आपल्या रानातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्यास जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले. आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी आणले. त्यांनी त्यास बोळ मिसळलेला द्राक्षरस दिला परंतु त्याने तो घेतला नाही. त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले. त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, “यहूद्यांचा राजा” असा लिहिला होता.