YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:51-72

मार्क 14:51-72 IRVMAR

एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागे चालत होता. त्यांनी त्यास धरले, परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघडाच पळून गेला. नंतर त्यांनी येशूला तेथून महायाजकाकडे नेले आणि सर्व मुख्य याजक लोक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले. थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे सरळ महायाजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला. मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना. पुष्कळांनी त्याच्याविरुध्द खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती. नंतर काहीजण उभे राहीले आणि त्याच्याविरुध्द साक्ष देऊन म्हणाले, आम्ही त्यास असे म्हणताना ऐकले की, “हाताने बांधलेले परमेश्वराचे भवन मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे भवन तीन दिवसात उभारीन.” परंतु तरीही याबाबतीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता. नंतर महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरुद्ध आरोप करताहेत हे कसे?” परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही. नंतर महायाजकाने पुन्हा विचारले, “धन्यवादिताचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस काय?” येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.” महायाजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणाला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे? तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हास काय वाटते?” सर्वांनी त्यास मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्मावली. काहीजण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्क्या मारू लागले व त्यास म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” कामदारांनी त्यास ताब्यात घेतले आणि मारले. पेत्र अंगणात असतानाच महायाजकाच्या दासीपैकी एक तेथे आली. आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?” परंतु पेत्राने ते नाकारले आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला. जेव्हा दासीने त्यास पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.” पेत्राने पुन्हा ते नाकारले. नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.” पेत्र निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या मनुष्याविषयी बोलत आहात त्यास मी ओळखत नाही!” आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला, “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व मोठ्याने रडला.