‘खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला, ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली, तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर. तुझा फिर्यादी तुझ्याबरोबर वाटेवर आहे तोच त्याच्याशी समेट कर, नाही तर कदाचित फिर्यादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरूंगात पडशील. मी तुला खरे सांगतो शेवटची दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस.
‘व्यभिचार करू नको,’ म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे, मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे; तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
‘कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे सांगितले होते. मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या पत्नीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.
आणखी ‘खोटी शपथ वाहू नको’ तर ‘आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो शपथ वाहूच नका; स्वर्गाची नका, कारण ते देवाचे आसन आहे; पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे; यरूशलेमेचीहि वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे. आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. तर तुमचे बोलणे, होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे; याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे.
‘डोळ्याबद्दल डोळा’ व ‘दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे; आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको.