YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्त. 24:1-22

मत्त. 24:1-22 IRVMAR

मग येशू परमेश्वराच्या भवनातून बाहेर येऊन पुढे जात होता, त्याचे शिष्य त्याच्याकडे त्यास परमेश्वराचे भवन दाखवायला आले. परंतु त्याने, त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही या सर्व गोष्टी पाहता ना? आता, मी तुम्हास खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहू दिला जाणार नाही.” मग तो जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात येऊन म्हणाले, “आम्हास सांगा की या गोष्टी कधी होतील? आपल्या येण्याचा आणि युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या चिन्हावरून ओळखावे?” येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळ कोणीही तुम्हास फसवू नये. कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांस फसवतील. सांभाळ, तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही. कारण, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील. पण या सर्व गोष्टी प्रसूतीवेदनांची सुरूवात अशा आहेत. ते तुम्हास छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. मग पुष्कळांना अडथळा होईल. ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील. सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल. सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल. तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.) त्यावेळी यहूदीया प्रांतातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये. जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी माघारी परत जाऊ नये. त्याकाळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अश्या स्त्रियांना फार कठीण जाईल. जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा थंडीचे दिवस अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्याकाळी येतील. आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील.