येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, तो म्हणाला, “नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा आणि पाळा. पण तुम्ही त्यांच्या कृतीप्रमाणे तसे करू नका. याचे कारण ते सांगतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व लोकांच्या खांद्यांवर देतात पण स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत. ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात कारण ते आपली स्मरणपत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात. मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना ‘रब्बी’ म्हणावे असे त्यांना वाटते. परंतु तुम्ही स्वतःला ‘रब्बी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे. आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येकजण मोठा गणला जाईल. अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्हास हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. अहो परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता; यामुळे तुम्हास अधिक शिक्षा होइल. परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात कारण तुम्ही एक मतानुसारी करण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तुम्हास तो मिळाला म्हणजे तुम्ही त्यास आपल्याहून दुप्पट नरकपुत्रासारखे करून टाकता. तुम्हास दुःख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता, जर कोणी परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तर काही नाही; पण जर एखादा त्या भवनातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर तो बांधलेला आहे. तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि परमेश्वराचे भवन यांपैकी कोणते अधिक महत्त्वाचे आहे? ते सोने किंवा भवन, जे त्या सोन्याला पवित्र बनवते. आणि तुम्ही असे म्हणता. जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यामध्ये काही वावगे नाही. पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर तो बांधलेला आहे. तुम्ही आंधळे आहात कारण मोठे काय आहे? ते अर्पण की अर्पणाला पवित्र करणारी वेदी? म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो. तसेच जो परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तो भवन व त्यामध्ये राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो. जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो.
मत्त. 23 वाचा
ऐका मत्त. 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्त. 23:1-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ