YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्त. 19:16-30

मत्त. 19:16-30 IRVMAR

नंतर पाहा, कोणीएक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?” येशूने उत्तर दिले, “काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला सार्वकालिक जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ.” त्याने विचारले, “कोणत्या आज्ञा?” येशूने उत्तर दिले, “खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको. आपल्या आई-वडीलांना मान दे आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी इतरावर प्रीती कर.” तो तरुण म्हणाला, “या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे. मी आणखी काय करावे?” येशूने उत्तर दिले, “तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठी संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये.” पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्यास फार दुःख झाले कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला. तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, धनवान मनुष्यास स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. मी तुम्हास सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे.” जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?” येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.” पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडले आणि तुमच्यामागे आलो आहोत; मग आम्हास काय मिळेल?” येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी राजासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा राजासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल. ज्याने ज्याने माझ्यामागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल. पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.”