मग त्यांचा सर्व समुदाय उठला व त्यांनी येशूला पिलाताकडे नेले. व ते त्याच्यावर आरोप करू लागले. ते म्हणाले, “आम्ही या मनुष्यास लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.” मग पिलाताने येशूला विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशू म्हणाला, “आपण म्हणता तसेच.” मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, या मनुष्यावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही. पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, “यहूदीया प्रांतातील सर्व लोकांस तो आपल्या शिकवणीने चिथावित आहे, त्याने गालील प्रांतापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे.” पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने विचारले की, “हा मनुष्य गालील प्रांताचा आहे काय?” जेव्हा त्यास समजले की, येशू हेरोदाच्या अधिकाराखाली येतो, तेव्हा त्याने त्यास हेरोदाकडे पाठवले. तो त्या दिवसात यरूशलेम शहरामध्येच होता. हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्यास फार आनंद झाला, कारण त्याने त्याजविषयी ऐकले होते व त्यास असे वाटत होते की, तो एखादा चमत्कार करील व आपल्याला तो बघायला मिळेल अशी आशा त्यास होती. त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्यास उत्तर दिले नाही. मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे राहून त्याच्याविरुध्द जोरदारपणे आरोप करीत होते. हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले. त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले त्यापुर्वी ते एकमेकांचे वैरी होते.
लूक 23 वाचा
ऐका लूक 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 23:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ