YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 22:47-71

लूक 22:47-71 IRVMAR

तो बोलत असतांनाच लोकांचा जमाव आला व बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एकजण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला. परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतोस काय?” त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे ओळखून त्यास म्हणाले, “प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय?” त्यांच्यापैकी एकाने महायाजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला. येशूने उत्तर दिले, “हे पुरेसे असू द्या.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले. नंतर येशू मुख्य याजक लोक, परमेश्वराच्या भवनाचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते, त्यांना म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात, जसा काय मी लुटारु आहे. मी तर तुम्हाबरोबर दररोज परमेश्वराच्या भवनात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची वेळ आणि अंधाराची सत्ता आहे.” त्यांनी त्यास अटक केली व ते त्यास महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र दुरून त्यांच्यामागे चालला. त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला आणि त्याच्याभोवती बसले व पेत्रही त्यांच्यात बसला. तेव्हा कोणाएका दासीने तेथे त्यास विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.” पेत्र ते नाकारुन म्हणाला, “बाई, मी त्यास ओळखत नाही.” थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्यास पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!” पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!” नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एकजण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालील प्रांताचा आहे.” परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!” तो बोलत असतांना त्याच क्षणी कोंबडा आरवला. आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारिलेले वाक्य आठवले, “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्यास आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्यास मारायला सुरुवात केली. त्यांनी त्याचे डोळे बांधले व त्यास प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?” आणि ते त्याची निंदा करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले. दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली आणि ते त्यास त्यांच्या सभेत घेऊन गेले. ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हास सांग” येशू त्यांना म्हणाला, जरी “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि जरी मी तुम्हास प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देणार नाही. पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.” ते सर्व म्हणाले, तर मग तू देवाचा पुत्र आहेस काय? त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही म्हणता की, मी आहे.” मग ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीची काय गरज आहे? आपण स्वतः त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहेत.”