ज्या गोष्टींची आम्हास पक्की खातरी आहे त्या गोष्टी जे प्रारंभापासून प्रत्यक्ष पाहाणारे व शब्दाचे सेवक होते, त्यांनी त्या जशा आम्हास सोपवून दिल्या त्या तशाच सांगाव्या म्हणून त्यांविषयीचा वृत्तांत अनुक्रमाने लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे. म्हणून हे थियफिला महाराज, मी सर्व गोष्टींचा मुळापासून चांगला शोध केल्यामुळे मलाही हे बरे वाटले की, या सर्व घटनांविषयीची माहिती आपणाला व्यवस्थित पणे माहिती लिहावी. यासाठी की ज्या गोष्टींचे शिक्षण आपल्याला मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपण पूर्णपणे जाणावा. यहूदीया प्रांताचा राजा हेरोद याच्या दिवसात, जखऱ्या नावाचा कोणी याजक होता. तो अबीयाच्या याजक घराण्यातील असून त्याची पत्नी अहरोनाच्या वंशातील होती व तिचे नाव अलीशिबा होते. ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत. परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती, शिवाय ते दोघेही फार म्हातारे झाले होते. मग असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे त्याचे याजकाचे काम करत असता, याजकांच्या रीतीप्रमाणे परमेश्वराच्या भवनात धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करीत उभा होता. तेव्हा परमेश्वराचा दूत, धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्यास पाहून जखऱ्या भयभीत झाला. परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव. तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील. कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल. तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलीयाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल. मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे घडणारच असे मी कशावरुन समजू? कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नीसुद्धा उतारवयात आहे.” देवदूताने त्यास उत्तर दिले, “मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे आणि तुझ्याशी बोलायला व तुलाही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे. पाहा, हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील कारण माझे शब्द जे योग्यवेळी पूर्णपणे खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.” तेव्हा जखऱ्याची वाट पाहणाऱ्या लोकांस तो परमेश्वराच्या भवनात इतका वेळ का राहिला याचे आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्यास त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्यांना जाणिव झाली की, परमेश्वराच्या भवनात त्याने दृष्टांत पाहिला आहे. तो त्यांना खुणा करत होता परंतु तो तसाच मुका राहीला. मग असे झाले की त्याच्या सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो घरी परत गेला.
लूक 1 वाचा
ऐका लूक 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 1:1-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ