यहो. 6
6
यरीहोचा पाडाव
1इस्राएल सैन्याच्या भीतीमुळे यरीहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. 2परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत. 3तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. 4सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी कर्णे वाजवावेत, 5नंतर ते एडक्याच्या शिंगाच्या कर्ण्यानी दीर्घ नाद करतील आणि जेव्हा तुम्ही कर्ण्याचा आवाज ऐकाल तेव्हा सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा म्हणजे नगराच्या भिंती जागच्या जागी कोसळतील; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.” 6नंतर नूनाचा पुत्र यहोशवा याने याजकांना बोलावले आणि त्यांना म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजकांनी सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालत जावे.” 7तो लोकांस म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे.” 8यहोशवाने लोकांस सांगितल्याप्रमाणे सात याजक परमेश्वर देवापुढे एडक्याच्या शिंगांचे सात कर्णे वाजवत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. 9सशस्त्र लोक कर्णे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि कर्ण्याची गर्जना होत असताना पाठीमागचे संरक्षक सैन्य कराराच्या कोशाच्या मागोमाग येत होते. 10मग यहोशवाने लोकांस अशी आज्ञा केली की, मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, “त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडातून एक शब्दही काढू नका; मग मी सांगेन तेव्हाच जयघोष करा.” 11या प्रकारे परमेश्वराच्या कराराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. 12यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कराराचा कोश उचलून घेतला. 13सात याजक एडक्याच्या शिंगांचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी वाजवीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; कर्णे वाजवले जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कराराच्या कोशामागे चालत होते. 14ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले. 15सातव्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला सात प्रदक्षिणा घातल्या. 16सातव्या वेळी याजक कर्णे वाजवीत असताना यहोशवा लोकांस म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे; 17हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वरास समर्पित करावे; मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्यासोबत तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते. 18तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वदा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल, तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणाल व तिला संकटात पाडाल. 19पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची सर्व पात्रे परमेश्वराकरता पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.” 20तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि कर्णे वाजत राहिले, कर्ण्यांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते काबीज केले. 21त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, बैल व मेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. 22तेव्हा जे दोन पुरुष तो देश हेरावयाला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, “तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.” 23तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आई-वडीलांना, भाऊबंदांना, तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले. 24मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली. 25यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या वडिलांचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वस्ती करून आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते. 26त्या वेळी यहोशवाने त्यांना शपथ घातली आणि तो त्यांना म्हणाला की, “जो कोणी यरीहो नगर पुन्हा बांधील त्यास परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.” 27याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.
सध्या निवडलेले:
यहो. 6: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.