YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहो. 2:1-14

यहो. 2:1-14 IRVMAR

नंतर नूनाचा पुत्र यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले, त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषतः यरीहो शहर हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरीहोच्या राजाला सांगितले की, “काही इस्राएल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.” त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, “पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेशीचा दरवाजा लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले, ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे तुम्ही कदाचित त्यांना पकडू शकाल.” पण तिने तर त्या मनुष्यांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यामध्ये लपवून ठेवले होते. त्यांचा पाठलाग करणारे लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांचा पाठलाग करणारे हे लोक गावाबाहेर पडताच वेशीचे दरवाजे बंद करण्यात आले. इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती त्यांच्याकडे धाब्यावर गेली, ती म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हांला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाश्यांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला माहीत आहे. कारण तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोऱ्यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमचे अवसान गळून गेले आणि कोणामध्येही धैर्य राहिले नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या वडिलाच्या घराण्यावर दया करू, आणि मला अचूक खूण द्या, तसेच तुम्ही माझे आईवडील, भाऊ, बहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण मरणापासून वाचवू, अशीही शपथ घ्या.” तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्हीही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही, तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ, आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.”