YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयो. 7

7
ईयोब परमेश्वराशी वाद घालतो
1“प्रत्येक मनुष्यास पृथ्वीवर खूप कष्ट करावे लागतात की नाही?
त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते कि नाही?
2गुलामाप्रमाणे मनुष्यास काम केल्यानंतर संध्याकाळी सावलीची गरज भासते. मनुष्य काम केल्यानंतर पगाराच्या दिवसाची वाट बघणाऱ्या मजुराप्रमाणे आहे.
3म्हणून माझे अनेक महीने हालअपेष्टातून गेले आहेत, माझ्या वाट्याला कष्टाचीच रात्र आली आहे.
4जेव्हा मी झोपी जातो, मी स्वतःला म्हणतो? रात्र केव्हा निघून जाईन? आणि केव्हा मी ऊठेन? एकसारखा मी तळमळतो दिवस उजाडेपर्यंत.
5माझे शरीर किड्यांनी आणि मातीच्या ढेकळानी भरलेले आहे, माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.
6माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते.
7देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्वास आहे हे आठव, माझे नेत्र काही चांगले पाहणार नाही.
8देवाचे डोळे माझ्यावर आहेत, त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही,
देवाचे डोळे माझा शोध करतील परंतू मी नसणार.
9ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो. त्याचप्रमाणे मनुष्य मरतो आणि थडग्यात पुरला जातो. तो पुन्हा कधीही परत येत नाही.
10तो त्याच्या घरात कधीही परत येणार नाही. त्याची जागा त्यास ओळखणार नाही.
11तेव्हा मी गप्प बसणार नाही,
मी माझ्या आत्म्याच्या क्लेशातून बोलेन, माझ्या जिवाच्या कडूपणातून मी बोलेन.
12तू माझ्यावर पहारा का करीत आहेस? मी समुद्र आहे का? किंवा समुद्री राक्षस आहे?
13माझे अंथरुणच मला स्वस्थता देऊ शकेल. माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थ्य देईल.
14तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस. आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते.
15म्हणून जगण्यापेक्षा गुदमरुन मरणे मी पसंत करतो.
16मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो. मी आशा सोडून दिली आहे. मला जगण्याची आसक्ती नाही. मला एकटा सोडून दे. माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.
17मनुष्य तुला इतका महत्वाचा वाटतो, तू त्यास इतका आदर का दाखवावास, तू त्याची दखल तरी का घेतोस.
18तू त्यास रोज सकाळी का भेटतोस आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस?
19तू माझ्यावरची आपली नजर काढीत नाहीस, थुंकी गिळण्यासही तू मला वेळ देत नाहीस, असे कोठवर चालणार?
20तू लोकांवर नजर ठेवतोस. मी पाप केले असले तरी मी आता काय करु शकतो? तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस, मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का?
21तू मला माझ्या घोर अन्यायाची आणि माझा आज्ञाभंगाची क्षमा का करून टाकीत नाहीस?
मी आता असाच धुळीत पडून राहणार
तू नंतर माझा शोध घेशील पण मी अस्तित्वात नसेल.”

सध्या निवडलेले:

ईयो. 7: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन