म्हणून ते त्यास म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की ते बघून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यास स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.’ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, मोशेने तुम्हास स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हास देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.” तेव्हा ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्या.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहीले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हास सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही. कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.” “मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे” असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. तेव्हा ते म्हणाले, “हा येशू योसेफाचा मुलगा नाही काय? याच्या पित्याला आणि आईला आम्ही ओळखतो. आता हा कसे म्हणतो, मी स्वर्गातून उतरलो आहे?” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही आपआपल्यात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहीले आहे की, ‘ते सगळे देवाने शिकवलेले असे होतील’, जो पित्याकडून ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. जो देवापासून आहे त्याने पित्याला पाहिले आहे. त्याच्याशिवाय कोणी पित्याला पाहिले आहे असे नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला आणि ते मरण पावले. पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” तेव्हा यहूद्यांनी आपआपल्यात वाद वाढवून म्हटले, “हा आम्हास आपला देह कसा खायला देऊ शकेल?” यावरुन येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्यास शेवटल्या दिवशी पुन्हा उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि मी जसा पित्यामुळे जगतो, तसे जो मला खातो तोसुध्दा माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मरण पावले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.” कफर्णहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात या गोष्टी सांगितल्या.
योहा. 6 वाचा
ऐका योहा. 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहा. 6:30-59
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ