मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” येशूने त्यास उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.” पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.” येशूने त्यास म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.” कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.”
मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, “मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय? तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे. मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत. कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे. मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही. या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात. मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो. तरी, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुद्ध आपली टाच उचलली,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. आतापासून हे होण्याच्या आधीच मी हे तुम्हास सांगून ठेवतो, यासाठी की जेव्हा हे होईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे. मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास स्वीकारतो.”