यिर्मयासाठी परमेश्वराकडून जे वचन आले ते असे, ते म्हणाले: यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषीत कर! “हे यहूदातील लोकहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आत जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका! सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपली वाट नीट करा आणि चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही असे केल्यास मी तुम्हास या ठिकाणी राहू देईन “परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर हे आहे. असे खोटे बोलणाऱ्या वाईट गोष्टींस स्वत:स सोपवून देऊ नकोस. कारण जर तू आपला मार्ग नीट केलास आणि चांगले ते केलेस, जर तू शेजारी आणि मनुष्यांमध्ये पुर्णपणे न्याय केला, जर तू देशात राहणाऱ्याचे, अनाथाचे, आणि विधवेचे शोषण करणार नाहीस, आणि या स्थानात निर्दोष रक्त पाडणार नाहीस आणि स्वत:चे नुकसान करून घ्यायला इतर देवतांच्या मागे चालणार नाहीस, तर या स्थानात, जे राष्ट्र पुरातन काळी तुमच्या या पूर्वजांना मी सर्वकाळासाठी दिला होता, त्यामध्ये मी तुला राहू देईन. पाहा! तुम्ही फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहात, जे तुमची काहीएक मदत करु शकत नाही. तुम्ही चोरी, खून आणि व्यभिचार आणि खोटी शपथ वाहाल आणि बालमुर्तीस धूप जाळाल आणि ज्या देवांना तुम्ही जाणले नाही त्यांच्या मागे चालाल, मग ज्या घरात माझ्या नावाची घोषणा होते, तिथे तुम्ही येऊन माझ्या समोर उभे राहून असे म्हणाल का आम्ही तारले गेलो आहोत? म्हणजे तुम्ही हे सर्व घृणीत काम पुन्हा कराल. ज्या घराला माझे नाव आहे, ते तुमच्या दृष्टीने दुसरे काही नसून लुटारूंना लपण्याची जागा आहे का? पाहा, माझ्या दृष्टीस असे आले आहे, असे परमेश्वर म्हणतो. तर तुम्ही शिलो येथील जे माझे ठिकाण होते तेथे जा, ज्यात पहिल्याने माझे नाव वसविले आणि त्याचे मी आपले लोक, इस्राएल यांच्या दुष्कृत्यांमुळे जे केले ते पाहा. इस्राएलाच्या लोकांनो, तुम्हीही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” परमेश्वर असे म्हणतो! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हास बोलाविले, पण तुम्ही उत्तर दिले नाही. म्हणून, शिलोचे जसे मी केले, त्याचप्रकारे ज्या घरास माझे नाव आहे आणि ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे ठिकाण मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले तसे करीन. एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर केले, तसे मी तुम्हास माझ्यापासून दूर करीन.