YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्म. 29:1-14

यिर्म. 29:1-14 IRVMAR

बंदिवान करून नेलेल्यांतील राहिलेले वडील याजक, संदेष्टे आणि यरूशलेमेमधून बाबेलास ज्यास नबुखद्नेस्सराने कैद करून नेले होते, त्या सर्व लोकांस यिर्मया संदेष्ट्याने यरूशलेमेहून पत्र पाठवले. राजा यकन्या, राजमाता, व उच्च अधिकारी, यहूदाचे व यरूशलेमेचे नेते, व कारागीर हे यरूशलेमेमधून निघून गेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठवले. ज्यांना यहूदाचा राजा सिद्कीया याने बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्याकडे एलास शाफानाचा व गमऱ्या हिल्कीयाचा मुलगा यांच्या हस्ते पत्र पाठवले. पत्रात असे म्हटले, ज्यांना मी यरूशलेमेहून कैद करून बाबेलास नेण्यास लावले त्या सर्वांना सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे सांगतो, “घरे बांधून त्यामध्ये राहा. बागे लावा आणि त्याचे फळ खा. स्त्रिया करा, आणि मुलाला व मुलीला जन्म द्या, नंतर आपल्या मुलांसाठी स्त्रिया करून द्या आणि तुमच्या मुलींना नवरे करून द्या. त्यांनी मुलांना व मुलींना जन्म द्यावा. तेथे तुम्ही वाढा, कमी होऊ नका. मी ज्या नगरांत तुम्हास बंदिवान करून न्यायला लावले त्याच्या शांतीसाठी झटा आणि त्यांच्यावतीने माझ्याबरोबर मध्यस्थी करा. कारण त्यांच्या शांतीत तुमची शांती आहे.” कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “तुमच्यामध्ये असलेले तुमचे संदेष्टे आणि ज्योतिषीह्न्जी यांनी तुम्हास फसवू नये आणि तुम्ही ज्यास आपली स्वप्ने पाहण्यास लावता त्याचे तुम्ही ऐकू नका. कारण ते माझ्या नामाने लबाड भविष्य सांगतात. मी त्यांना बाहेर पाठविले नाही.” असे परमेश्वर म्हणतो. कारण परमेश्वर असे म्हणतो, जेव्हा बाबेलाच्या राज्यास सत्तर वर्षे होतील, मी तुम्हास मदत करील आणि तुम्हास या स्थळी परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन. कारण परमेश्वर असे म्हणतो की, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या मी जाणतो; त्या योजना तुमच्या हिताच्या आहेत आणि अनिष्टासाठी नाहीत, त्या तुम्हास भविष्य व आशा देणाऱ्या आहेत. मग तुम्ही माझा धावा कराल आणि जाऊन माझी प्रार्थना कराल आणि तेव्हा मी तुमचे ऐकेन. कारण जेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण हृदयाने मला शोधाल, तेव्हा मी तुम्हास सापडेन. परमेश्वर असे म्हणतो की मग मी तुम्हास प्राप्त होईल. “मी तुम्हास बंदिवासातून परत आणीन आणि ज्या सर्व राष्ट्रांत व सर्व स्थानात मी तुम्हास विखरविले त्यातून मी तुम्हास एकवटीन आणि ज्या स्थानातून मी तुम्हास कैद करून नेले आहे त्याकडे मी तुम्हास परत आणीन.” असे परमेश्वर म्हणतो.