YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री. 10:1-23

इब्री. 10:1-23 IRVMAR

अशाप्रकारे, पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पील्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. जर नियमशास्त्र लोकांस परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर पापांची भावना नसल्याने दोषी ठरले नसते. परंतु त्याऐवजी ते यज्ञ वर्षानुवर्षे पापांची आठवण करून देतात. कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे अशक्य आहे. म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो देवाला म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमार्पणांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही. ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अन्नार्पणे, होमार्पणे व पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यामध्ये तुला संतोष नव्हता.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे करण्यात येतात.) मग तो म्हणाला, “हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” दुसरे स्थापावे म्हणून तो पहिले काढून टाकतो. देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत. प्रत्येक याजक तर दररोज सेवा करत आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो. परंतु आपल्या पापांबद्दल सर्वकाळासाठी एकदाच ख्रिस्ताने अर्पण केले व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे. आणि तेव्हापासून आपले वैरी नमवून आपले पादासन होईपर्यंत वाट पाहत आहे. कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले. पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो, परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसानंतर त्यांच्याशी मी करार करीन तो हा; मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.” “आणि मी त्यांची पापे व अधर्म कृत्ये कधीही आठवणारच नाही.” जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे नाही. म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानात जाण्याचे धैर्य आहे. त्याने पडद्यामधून म्हणजे आपल्या स्वतःच्या देहातून, आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे. कारण देवाच्या घरावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे. म्हणून आपली हृदये दुष्ट विवेकभावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेली आणि आपले शरीर निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. आपल्याला जी आशा आहे तिला आपण घट्ट धरुन राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.