उत्प. 49
49
आपल्या मुलांविषयी याकोबाने केलेले भाकीत
अनु. 33:1-29
1त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.”
2“याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका,
तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.
3रऊबेना, तू माझा पहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस. पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस,
तू सर्वांपेक्षा अधिक शक्तीवान व सर्वांपेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस.
4परंतु तुझ्या भावना पुराच्या पाण्याच्या अनावर व चंचल लाटांप्रमाणे आहेत.
कारण तू आपल्या वडिलाच्या पलंगावर गेलास व त्याच्या बिछान्यावर जाऊन तो अशुद्ध केलास.”
5“शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत.
या दोन भावांना तलवारीने लढण्याची आवड आहे.
6माझ्या जिवा, त्यांच्या गुप्त मसलतींमध्ये गुंतू नको;
त्यांच्या गुप्त बैठकांमध्ये सामील होऊ नको, त्यांचे हे बेत माझ्या जिवाला मान्य नाहीत.
त्यांनी त्यांच्या रागाच्या भरात पुरुषांची कत्तल केली.
आपल्या रागाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या.
7त्यांचा राग शाप आहे, ते अति रागाने वेडे होतात.
तेव्हा अतिशय क्रूर बनतात. मी त्यांना याकोबात विभागीन,
ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.
8यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील.
तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील.
तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील.
9यहूदा सिंहाचा छावा आहे.
माझ्या मुला, तू शिकारीपासून वरपर्यंत गेलास. तो खाली वाकला आहे,
तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा #मोठ्या सिंहासारखा दबा धरून बसला आहे.
त्यास उठवण्याचे धाडस कोण करील?
10शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही,
किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही.
राष्ट्रे त्याच्या आज्ञा पाळतील#किंवा ज्याच्या मालकीचे आहे तो येईपर्यंत.
11तो त्याचा तरुण घोडा द्राक्षवेलीस,
आणि त्याचे शिंगरु खास द्राक्षवेलीस बांधेल.
त्याने त्याचे वस्त्र द्राक्षरसात आणि आपला झगा द्राक्षांच्या रक्तात धुतला आहे.
12त्याचे डोळे द्राक्षरसापेक्षा अधिक लालबुंद होतील.
त्याचे दात दूधापेक्षा अधिक सफेद होतील.
13जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल. तो जहाजासाठी सुरक्षित बंदर होईल.
त्याच्या जमिनीची हद्द सीदोन नगरापर्यंत असेल.”
14“इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांच्यामध्ये #मेंढ्यांच्या दोन समूहाच्या मध्ये दबून बसला आहे.
15आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे,
आपला देश आनंददायक आहे असे त्याने पाहिले,
आणि मग जड बोजा वाहून नेण्यास व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार झाला.
16इस्राएलाचा एक वंश या नात्याने दान आपल्या लोकांचा न्याय करील.
17तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे,
वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल.
तो घोड्याच्या टाचेला दंश करील.
त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरून मागे कोसळेल.
18हे परमेश्वरा, तुझ्याकडून उद्धार होण्याची मी वाट पाहत आहे.
19गाद-लुटारूंची टोळी त्याच्यावर हल्ला करेल,
परंतु तो त्यांच्या पार्श्वभागावर हल्ला करून त्यांना पळवून लावील.
20आशेराचे अन्न समृद्ध होईल आणि तो राजाला योग्य असे शाही अन्नपदार्थ पुरवील.
21नफताली मोकळ्या सुटलेल्या हरीणीप्रमाणे आहे.
त्याचे बोलणे गोड असेल.
22योसेफ हा फलदायी फाट्यासारखा आहे.
तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे. त्याच्या फांद्या भिंतीवर चढून पसरल्या आहेत.
23तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला.
आणि त्यास तीर मारले व त्यास त्रास दिला.
24तरी त्याचे धनुष्य मजबूत राहील,
आणि त्याचे बाहु कुशल होतील याकोबाचा सामर्थ्यवान देव,
मेंढपाळ, इस्राएलाचा खडक याजकडून त्याच्या हातांना शक्ती मिळते.
25कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील,
आणि सर्वशक्तिमान देवामुळे, जो तुला वरून आकाशाचे आशीर्वाद,
खाली खोल दरीचे आशीर्वाद देवो,
तसेच स्तनांचा व गर्भाशयांच्या उपजांचा आशीर्वाद तो तुला देवो.
26तुझ्या बापाचे आशीर्वाद माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादापेक्षा मोठे होतील,
अथवा सर्वकाळ टिकून राहणाऱ्या डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इच्छित वस्तुंहून श्रेष्ठ होतील.
ते योसेफाच्या मस्तकावर, जो आपल्या भावांमध्ये राजपुत्र
त्याच्या मस्तकावर आशीर्वाद असे राहतील.
27बन्यामीन हा भुकेला लांडगा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारून खाईल, आणि संध्याकाळी तो लूट वाटून घेईल.” 28हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत. त्यांच्या वडिलाने आशीर्वाद देऊन त्यांना म्हटले ते हेच. त्याने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला.
याकोबाचा मृत्यू व त्याचे दफन
29मग त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांना म्हणाला, “मी आता माझ्या लोकांकडे जात आहे. एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे, 30ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले. 31अब्राहाम व त्याची पत्नी सारा, यांना त्या गुहेत पुरले आहे; इसहाक आणि त्याची पत्नी रिबका यांनाही तेथेच पुरले आहे; आणि माझी पत्नी लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे. 32ते शेत व ती गुहा हेथी लोकांकडून विकत घेतलेली आहे.” 33आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर याकोबाने आपले पाय पलंगावर जवळ ओढून घेतले व मरण पावला, आणि तो आपल्या पूर्वजांकडे गेला.
सध्या निवडलेले:
उत्प. 49: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.