YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्प. 45:1-8

उत्प. 45:1-8 IRVMAR

आता मात्र योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्व सेवकांसमोर दुःख रोखून धरता येईना. तो मोठ्याने रडला. तो म्हणाला, “येथील सर्व लोकांस येथून बाहेर जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले. केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले. मग योसेफाने आपली ओळख त्यांना दिली. तो मोठ्याने रडला. मिसर देशाच्या लोकांनी व फारो राजाच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले. मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय?” परंतु त्याचे भाऊ त्यास काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्या समोर ते फार घाबरले होते. तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले. आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतःवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती. हा दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही. देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे, यासाठी की, तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष रहावे आणि तुम्हास जिवंत ठेवून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या वडिलासमान केले आहे. त्यामुळे मी फारोच्या घरादाराचा धनी आणि सर्व मिसर देशाचा अधिकारी झालो आहे.”