YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्प. 42:1-9

उत्प. 42:1-9 IRVMAR

मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांकडे असे का बघत बसलात?” “इकडे पाहा, मिसर देशात धान्य आहे असे मी ऐकले आहे. तुम्ही खाली जाऊन आपणासाठी तिकडून धान्य विकत आणा म्हणजे आपण जगू, मरणार नाही.” तेव्हा योसेफाचे दहा भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले. याकोबाने, योसेफाचा भाऊ बन्यामीन याला त्याच्या भावाबरोबर पाठवले नाही, कारण तो म्हणाला, “कदाचित त्यास काही अपाय होईल.” कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकात इस्राएलाचे पुत्रही होते. त्या वेळी योसेफ मिसरचा अधिपती होता. तो देशातल्या सर्व लोकांस धान्य विकत असे. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्यांनी आपली तोंडे भूमीकडे करून खाली वाकून नमन केले. योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले, परंतु ते कोण आहेत हे माहीत नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला. त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?” त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.” योसेफाने आपल्या भावांना ओळखले, परंतु त्यांनी त्यास ओळखले नाही. आणि मग योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने आठवली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात. तुम्ही धान्य खरेदी करण्यास नव्हे तर आमच्या देशाचा कमजोर भाग हेरण्यास आला आहात.”