मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणांस कळविले आहे. त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे आहेत. स्वप्ने सारखीच आहेत. त्या दुसऱ्या सात दुबळ्या गाई व ती सात सुकलेली व पूर्वेच्या वऱ्याने करपलेली कणसेही म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे आहेत. जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. पाहा सर्व मिसर देशात सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल. परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की, त्यामुळे मिसर देशाला सुकाळाचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील. आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांस विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल. तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे. तेव्हा, फारोने एखाद्या समंजस व शहाण्या मनुष्याची निवड करून त्यास सर्व मिसर देशावर नेमावे. फारोने हे करावे: देशावर देखरेख करणारे नेमावे. त्यांनी येत्या सात वर्षांच्या सुकाळात मिसरातल्या पिकाचा पाचवा हिस्सा गोळा करून घ्यावा. अशा रीतीने ही जी येणारी चांगली वर्षे, त्यामध्ये सर्व अन्नधान्य गोळा करावे. फारोच्या अधिकाराखाली ते धान्य नगरांमध्ये साठवून ठेवावे. त्यांनी त्याची राखण करावी. येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा पुरवठा मिसर देशाला करावा. अशा प्रकारे मग दुष्काळाच्या सात वर्षात देशाचा नाश होणार नाही.” हा सल्ला फारो राजाच्या दृष्टीने व त्याच्या सर्व सेवकांच्या दृष्टीने चांगला वाटला. फारो त्याच्या सेवकांना म्हणाला, “देवाचा आत्मा ज्याच्यात आहे असा, ह्याच्यापेक्षा अधिक चांगला व योग्य असा दुसरा कोणी मनुष्य सापडेल काय?” तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा समंजस व शहाणा दुसरा कोणी नाही. तू माझ्या घराचा अधिकारी हो आणि तुझ्या शब्दाप्रमाणे माझे सर्व लोक चालतील. या देशात केवळ राजासनापुरता म्हणून काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.”
उत्प. 41 वाचा
ऐका उत्प. 41
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्प. 41:25-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ