YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्प. 29:14-30

उत्प. 29:14-30 IRVMAR

मग लाबान त्यास म्हणाला, “खरोखर तू माझे हाड व माझे मांस आहेस.” त्यानंतर याकोब एक महिनाभर त्याच्यापाशी राहिला. लाबान याकोबाला म्हणाला, “तू काही मोबदला न घेता काम करीत राहावेस काय? कारण तू माझा नातलग आहेस तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग?” लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल. लेआचे डोळे अधू होते, परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती. याकोबाचे राहेलीवर प्रेम होते, म्हणून तो लाबानास म्हणाला, “तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.” लाबान म्हणाला, “परक्या मनुष्यास देण्यापेक्षा, ती मी तुला द्यावी हे बरे आहे. माझ्यापाशी राहा.” म्हणून याकोबाने सात वर्षे राहेलसाठी सेवाचाकरी केली; आणि राहेलीवरील प्रेमामुळे ती वर्षे त्यास फार थोड्या दिवसांसारखी वाटली. नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी पत्नी मला द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन.” तेव्हा लाबानाने तेथील सर्व लोकांस एकत्र केले आणि मेजवानी दिली. त्या संध्याकाळी लाबानाने आपली मुलगी लेआ हिला घेतले आणि याकोबाकडे आणले; तो तिच्यापाशी गेला लाबानाने आपली दासी जिल्पा आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली. सकाळी याकोबाने पाहिले तो पाहा, ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले?” लाबान म्हणाला, “आमच्या रीतीरीवाजाप्रमाणे थोरल्या मुलीच्या आधी आम्ही धाकट्या मुलीला देत नाही. या मुलीचा लग्न विधीचा सप्ताह पूर्ण होऊ दे, म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो, परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.” त्याप्रमाणे याकोबाने केले, लेआचे सप्तक पूर्ण केले. मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्यास पत्नी करून दिली; लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली. तेव्हा मग याकोबाने राहेलीशीही लग्न केले; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवाचाकरी केली.