YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहे. 36

36
इस्त्राएलाची भावी उर्जिकावस्था
1आता मानवाच्या मुला, तू इस्राएलाच्या पर्वताला भविष्य सांग आणि म्हण, इस्राएलामधील पर्वतांनो, परमेश्वराचे वचन ऐका. 2प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण शत्रू तुमच्याविषयी म्हणतात की, अहा! आणि प्राचीन उंच ठिकाणे आमची मालमत्ता झाली आहे. 3“म्हणून तू भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, ‘कारण त्यांनी तुमचा नाश केला आणि तुम्ही उरलेल्या राष्ट्रांना वतन व्हावे म्हणून त्यांनी सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही लोकांच्या तोंडी व जिभेने व गोष्टीचा निंदेचा विषय असे झाले आहात.” 4म्हणून, इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर पर्वत, व उंच टेकड्या, झरे, व दऱ्या उजाड आणि सोडून दिलेली नगरे यांना असे सांगतो की, 5“यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो की, खचित मी आपल्या आवेशाच्या अग्नीने पेटून उरलेल्या राष्ट्रांविषयी व अदोमाविषयी बोललो आहे. त्यांनी माझ्या देशाला लुटून रिकामे करावे म्हणून त्यांनी उल्लासीत हृदयाने, त्यांच्या मनातील तिरस्काराने, त्यांच्या कुरणासाठी घेतली.” 6“म्हणून, इस्राएल देशाला भविष्य सांग, आणि पर्वत, व टेकड्या, झरे आणि दऱ्या ह्यांच्याशी बोल. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी आपल्या आवेशाने आणि रागाने बोललो आहे. कारण, तुम्हास राष्ट्रांकडून अपमान सहन करावा लागला.” 7म्हणून, प्रभू परमेश्वर, म्हणतो, “मी आपला हात उंचावून वचन देतो की, तुमच्या भोवतालची राष्ट्रे खचित अप्रतिष्ठा पावतील.” 8“पण इस्राएलाच्या पर्वतांनो, तुम्हावरील झाडास फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांसाठी फळे द्याल असे लवकरच घडून येईल. 9कारण पाहा, मी तुम्हास अनुकूल आहे, आणि मी तुम्हाकडे वळेल, मग तुम्ही मशागत केलेले, व बी पेरलेले व्हाल. 10म्हणून मी तुम्हावर मनुष्याची, इस्राएलाचे सर्व घराणे, ते सर्वच बहुतपट करीन, आणि नगरे वसतील आणि ओसाड झालेली ठिकाणे पुन्हा उभारली जातील. 11मनुष्य व पशू यांना बहुतपट करीन आणि ते वाढतील व फळ देणारे होतील; पूर्वीच्याप्रमाणे लोक राहू लागतील. आणि तुमच्या पूर्वदिवसात केले त्यापेक्षा तुमचे मी अधिक कल्याण करीन मग तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. 12मी मनुष्ये, म्हणजे माझे इस्राएल लोक आणीन, ते तुमच्यावर चालतील असे मी करीन. ते तुझा ताबा घेतील आणि तू त्यांचे वतन होशील, आणि तू त्यांच्या मुलांच्या मरणाचे कारण होणार नाहीस.” 13प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण लोक तुम्हास म्हणतात, “तू लोकांस खाणारा देश आहेस, आणि तुझ्या देशाची मुले मरत आहेत. 14यास्तव यापुढे तू लोकांस खाणार नाहीस, आणि पुन्हा तू आपल्या राष्ट्राला त्यांच्या मृत्यूचा शोक करण्यास लावणार नाहीस.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो. 15“किंवा यापुढे मी तुला पुन्हा राष्ट्रांचा अपमान ऐकू देणार नाही. तुला लोकांची निंदा पुन्हा सहन करावी लागणार नाही किंवा तुझ्या राष्ट्रास पडू देणार नाहीस.” असे प्रभू परमेश्वर, म्हणतो. 16मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, 17“मानवाच्या मुला, इस्राएलाचे घराणे त्यांच्या देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मार्गाने व कृत्यांनी तो देश भ्रष्ट केला. त्यांचे मार्ग माझ्यापुढे रजस्रावी स्त्रीच्या विटाळाप्रमाणे आहेत. 18म्हणून त्यांनी जे रक्त भूमीवर पाडले होते त्यामुळे, आणि त्यांनी आपल्या मूर्तींनी तिला अशुद्ध केले होते त्यामुळे मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतला. 19मी त्यांना राष्ट्रांमध्ये पसरविले आणि सर्व देशात विखरुन टाकले. मी त्यांच्या मार्गाप्रमाणे व त्यांच्या कृत्याप्रमाणे न्याय केला. 20मग ते त्या दुसऱ्या राष्ट्रांत गेले आणि ते जेथे कोठे गेले, तेथेही त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले, तेव्हा लोक त्यांना म्हणाले, हे खरेच परमेश्वराचे लोक आहेत का? कारण त्यांना त्याच्या देशातून बाहेर फेकून दिले आहे. 21पण इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रात गेले त्यांनी माझे पवित्र नाव भ्रष्ट केले. तेव्हा मी आपल्या नावास जपलो. 22म्हणून इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल घराण्यांनो, मी हे तुमच्यासाठी करत नाही, तुम्ही जेथे जेथे गेलात, तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव भ्रष्ट केलेत त्याकरता मी हे करत आहे. 23कारण तुम्ही माझ्या महान नावास राष्ट्रांमध्ये भ्रष्ट केल्यामुळे त्या राष्ट्रांनी अपवित्र मानले, ती ते पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्राच्या देखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रास समजेल की, मी प्रभू परमेश्वर आहे. 24मी तुम्हास त्या राष्ट्रांतून काढून घेईन आणि तुम्हास प्रत्येक देशातून गोळा करीन व तुम्हास तुमच्या देशात आणीन. 25मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व अशुद्धतेपासून तुम्ही शुद्ध व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या सर्व मूर्तीपासून शुद्ध करीन. 26मी तुम्हास नवीन हृदय देईन, तुमच्या ठायी नवीन आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. 27मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन. आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. 28मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात रहाल. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन. 29कारण मी तुम्हास तुमच्या सर्व अशुद्धेतेपासून वाचवीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन. मी तुमच्यावर दुष्काळ पडू देणार नाही. 30मी झाडाचे फळ आणि शेतांचे उत्पादन वाढवीन याकरिता की, राष्ट्रांमध्ये तुम्हास दुष्काळामुळे होणारी निंदा सहन करावी लागणार नाही. 31मग तुम्ही तुमच्या वाईट मार्गाचे आणि जी तुमची कृत्ये चांगली नव्हती त्यांचा विचार कराल, तेव्हा तुम्ही आपल्या पापाबद्दल आणि घृणीत कृत्यांबद्दल स्वत:चाच द्वेष कराल. 32प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्याकरिता हे करत नाही, हे तुम्हास माहित असू द्या. म्हणून इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही आपल्या मार्गाविषयी लज्जित व फजीत व्हा. 33प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुम्हास तुमच्या सर्व अन्यायापासून शुद्ध करीन त्या दिवशी मी नगरे वसवीन आणि उजाड स्थाने बांधण्यात येतील. 34कारण जी भूमी, तिच्या जवळून जाणाऱ्या सर्वांना, ओसाड दिसत होती, ती ओसाड जमीन मशागत केल्याप्रमाणे दिसेल. 35ते म्हणतील, ‘ही जी जमीन ओसाड होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. जी नगरे ओसाड व उजाड व दुर्गम झाली होती ती आता तटबंदीची होऊन वसली आहेत. 36मग तुमच्या सभोवतालच्या राष्ट्रांना समजेल की, मी परमेश्वर आहे आणि मीच नष्ट झालेली ठिकाणे बांधून काढोत व ओसाड जमिनीत मी लागवड केली. मी परमेश्वर आहे. मी हे बोललो व ते मी करीनच. 37प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी हे त्यांच्यासाठी करावे म्हणून इस्राएलाच्या घराण्याकडून पुन्हा मागणी होईल; कळपाप्रमाणे मी त्यामध्ये लोकांची वाढ करीन. 38पवित्र यज्ञपशूंचा कळप, यरूशलेमेतील सणाचा कळप असतात त्याप्रमाणे ओसाड नगरे लोकांच्या कळपांनी भरून जातील; मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”

सध्या निवडलेले:

यहे. 36: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन