YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्ग. 4:18-26

निर्ग. 4:18-26 IRVMAR

मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो त्यास म्हणाला, “मला मिसरातील माझ्या भाऊबंदांकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.” इथ्रो मोशेला म्हणाला, शांतीने जा. मिद्यान प्रांतात असताना परमेश्वर मोशेला म्हणाला, “आता मिसर देशात परत जा. जे लोक तुला ठार मारू पाहत होते ते आता मरण पावले आहेत.” तेव्हा मोशेने आपली पत्नी व आपल्या मुलांना गाढवावर बसवले व त्यांना घेऊन तो मिसर देशाला माघारी जायल निघाला. तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू मिसरात परत जाशील तेव्हा पाहा, जे सर्व चमत्कार मी तुझ्या हाती ठेवले आहे ते तू फारोपुढे करून दाखव. तथापि मी त्याचे मन कठीण करीन, आणि तो लोकांस जाऊ देणार नाही. मग तू फारोला सांग की, परमेश्वर म्हणतो इस्राएल माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. परमेश्वर म्हणतो, मी तुला सांगत आहे की “तू माझ्या पुत्राला माझी उपासना करण्याकरता जाऊ दे!” जर तू त्यास जाऊ देण्याचे नाकारशील तर मी तुझ्या ज्येष्ठ पुत्राला ठार मारीन. मोशे प्रवासात असताना एके ठिकाणी मुक्कामासाठी थांबला. तेव्हा परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी गाठून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सिप्पोराने एक गारगोटीची धारदार सुरी घेतली व तिने आपल्या मुलाची सुंता केली. मग तिने मुलांची अग्रत्वचा घेतली आणि ती मोशेच्या पायावर ठेवून ती त्यास म्हणाली, “खचीत तू माझा रक्ताने मिळवलेला पती आहेस.” तेव्हा परमेश्वराने त्यास पीडण्याचे सोडले. रक्ताने मिळविलेला पती असे तिने सुंतेला उद्देशून म्हटले.