YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्ग. 3:14-22

निर्ग. 3:14-22 IRVMAR

देव मोशेस म्हणाला, “जो मी आहे तो मी आहे. देव म्हणाला. तू इस्राएल लोकांस सांग, मी आहे याने मला तुम्हांकडे पाठवले आहे.” देव मोशेला असे म्हणाला, “तू इस्राएल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हांकडे पाठवले आहे. हेच माझे सर्वकाळचे नाव आहे, व हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल; तू जाऊन इस्राएलाच्या वडीलजनांना एकत्रित करून त्यांना सांग की, तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव परमेश्वर, याने मला दर्शन देऊन म्हटले की, तुम्हांकडे खरोखर माझे लक्ष गेले आहे व मिसर देशात तुम्हांसोबत काय घडले आहे हे मला कळले आहे. आणि मी तुम्हास मिसऱ्यांच्या जाचातून सोडवीन व कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात, दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात घेऊन जाईन, असे मी सांगितले आहे हे त्यांना कळव. ते तुझे ऐकतील, मग तू व इस्राएलाचे वडीलजन मिळून तुम्ही मिसराच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्री लोकांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे. आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी म्हणून आम्हांला तीन दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे. परंतु मला माहीत आहे की, मिसराचा राजा तुम्हास जाऊ देणार नाही. त्यास माझे बाहुबल दाखविले तरी तो तुम्हास जाऊ देणार नाही; तेव्हा मी मिसर देशात आपले बाहुबल दाखवून, ज्या अद्भुत कृती मी करणार आहे, त्यांचा मारा मी त्याजवर करीन. मग तो तुम्हास जाऊ देईल; आणि या लोकांवर मिसऱ्यांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. आणि असे होईल की, तुम्ही निघाल तेव्हा रिकामे निघणार नाही. तर प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीकडून व आपल्या घरात राहणाऱ्या स्त्रीकडून भेटवस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेटवस्तू देतील; ते तुम्हा लोकांस सोन्यारुप्याचे दागिने व कपडे भेट म्हणून देतील. तुम्ही ते आपल्या मुलांच्या व मुलींच्या अंगावर घालाल. अशा प्रकारे तुम्ही मिसराच्या लोकांस लुटाल.”