YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्ग. 23:1-17

निर्ग. 23:1-17 IRVMAR

खोटी अफवा पसरवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस. दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नकोस, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नकोस. एखाद्या गरीब मनुष्याचा न्याय होताना, त्याची बाजू खरी असल्याशिवाय त्याचा पक्ष घेऊ नकोस. आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्यास वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोड. तुझ्या शत्रूचे गाढव जास्त ओझ्याखाली दबून पडलेले दिसले तर तू त्यास सोडून जाऊ नकोस, तू अवश्य त्याच्याबरोबर राहून ते सोड. तू आपल्या गरीबाच्या वादात त्याचा योग्य न्याय विपरीत होऊ देऊ नकोस; कोणावरही खोटे दोषारोप करू नकोस; एखाद्या निष्पाप वा निरपराधी ह्यांचा वध करू नकोस. कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही. लाच देण्याचा प्रयत्न करील, तर ती तू मुळीच घेऊ नकोस; लाच घेऊ नको कारण लाच डोळसास आंधळे करते; आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपरीत न्याय करते. परक्याला कधीही छळू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हास चांगली माहिती आहे; कारण तुम्ही देखील एके काळी मिसर देशात परके होता. सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर; आणि तिचे उत्पन्न साठीव. परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक राहू दे. त्या वर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतूनाची वने यांच्या बाबतीतही असेच करावे. तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर उपऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना ताजेतवाने वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल. मी जे काही सांगितले ते सर्व नियम कटाक्षाने पाळावेत; इतर देवांचे नांव देखील घेऊ नका; ते तुमच्या तोंडाने उच्चारू नका. वर्षातून तीनदा तू माझ्यासाठी उत्सव करून सण पाळ. बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्यामध्ये सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये. शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा. वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळावा. वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर यावे.