YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्ग. 12:1-13

निर्ग. 12:1-13 IRVMAR

मग मोशे व अहरोन मिसर देशामध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “हा महिना तुमच्यासाठी आरंभीचा महिना व्हावा. तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक मनुष्याने आपल्या कुटुंबातील लोकांकरता एक कोकरू घ्यावे. आणि एक कोकरू, खाण्यासाठी घरातील माणसे थोडी असली तर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती मनुष्यांना पुरेल याचा अंदाज घ्यावा. तो कोकरा एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निर्दोष असावा, तो कोकरा मेंढरातला किंवा बोकडातला असावा. तुम्हास वाटेल तो घ्यावा. या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा. संध्याकाळी इस्राएली मंडळीतील लोकांनी त्यास वधावे. त्या कोकऱ्याचे रक्त घेऊन ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीवर लावावे. त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून कडू भाजी व बेखमीर भाकरीबरोबर खावे. तुम्ही त्याचे मांस कच्चेच किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडी हीसुद्धा खावीत. त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि सकाळपर्यंत काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे. ते तुम्ही या प्रकारे खावे: तुमच्या कमरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन, ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे. आज रात्री मी मिसर देशात फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशू या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्षा करीन. मी परमेश्वर आहे. परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक खूण असेल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसर देशाला मारीन तेव्हा कोणताही अनर्थ तुम्हावर येणार नाही व तुमचा नाश होणार नाही