YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषि. 7:1-16

प्रेषि. 7:1-16 IRVMAR

महायाजक म्हणाला, “या गोष्टी अशाच आहेत काय?” तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका, आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता गौरवशाली देवाने त्यास दर्शन दिले.” व म्हटले, “तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात जा. तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारान नगरात जाऊन राहिला; मग त्याचा पिता मरण पावल्यावर देवाने त्यास तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले. पण त्यामध्ये त्यास वतन दिले नाही, पाऊल भर देखील जमीन दिली नाही. त्यास मूलबाळ नसताही देवाने त्यास अभिवचन दिले की, हा देश तुला व तुझ्यामागे तुझ्या संततीला वतन असा देईल. देवाने आणखी असे सांगितले त्याची संतती परदेशात जाऊन काही काळ राहतील, आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे वाईटाने वागवतील. ‘ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्यांचा न्याय मी करीन’ आणि त्यानंतर ते तेथून निघून ‘या स्थळी माझी उपासना करतील,’ असे देवाने म्हटले. त्याने अब्राहामाला सुंतेचा करार लावून दिला हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला, त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले. नंतर कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले, पण देव त्याच्याबरोबर होता. त्याने त्यास त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले, आणि मिसर देशाचा राजा फारो याच्यासमोर त्यास कृपापात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने त्यास मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले. मग सर्व मिसर: आणि कनान या देशात दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबाने तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले. मग दुसऱ्या खेपेस योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले. तेव्हा योसेफाने आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग, म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना बोलावून घेतले. ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला; आणि तेथे तो, व आपले पूर्वजही मरण पावले. त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना पुरले.

प्रेषि. 7:1-16 साठी चलचित्र