YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषि. 13:1-23

प्रेषि. 13:1-23 IRVMAR

अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते, ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता) आणि शौल. ही सर्व माणसे परमेश्वराची आराधना करीत व उपवास करीत असता, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा.” म्हणून मंडळीने उपवास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले. पवित्र आत्म्याच्याद्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले, ते सलुकीयात गेले, नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले. ते जेव्हा सलमी शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचे वचनाची यहूदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली मार्क म्हटलेला योहान हाही त्यांच्या मदतीला होता. ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले, पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला, तो जादूच्या करामती करीत असे, त्याचे नाव बर्येशू होते, तो खोटा संदेष्टा होता. बर्येशू नेहमी सिर्ग्य पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा, सिर्ग्य पौल राज्यपाल होता व तो हुशार होता, त्याने बर्णबा व शौल यांना आपणाकडे बोलावले, त्यास त्यांच्याकडून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दाखवली. परंतु अलीम “जादूगार” (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) हा बर्णबा व शौल यांच्याविरुद्ध होता, राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण शौल, ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता, पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला. “सैतानाच्या पुत्रा तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस, अवघ्या नीतिमानाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर आता पाहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे, तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही,” मग लागलेच अलीमावर धुके व अंधार पडला आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडेतिकडे फिरुन मनुष्यांचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला, प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला. पौल व जे त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले, ते पंफुलियातील पिर्गा गावी आले, परंतु योहान त्यांना सोडून परत यरूशलेमे शहरास गेला. पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला, पिर्गापासून पुढे ते पिसिदीयांतील अंत्युखियास गेले आणि शब्बाथ दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले. तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला, “बंधुनो, येथील लोकांस काही मदत होईल असे काही बोधवचने सांगा.” पौल उभा राहिला आणि आपला हात उंचावून म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो व देवाचे भय धरणाऱ्यांनो, ऐका. या इस्राएल लोकांच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली आणि ते ज्या काळात मिसरमध्ये परकी म्हणून राहत होते, त्या काळात देवाने त्यांना अगणित केले आणि उभारलेल्या बाहूने त्यांना तेथून बाहेर आणले. आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षात त्यांना सहनशीलता दाखविली. देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला, देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांस दिल्या. हे सर्व साधारणपणे चारशेपन्नास वर्षात घडले, त्यानंतर देवाने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत आपल्या लोकांस न्यायाधीश नेमून दिले. मग लोकांनी राजाची मागणी केली, देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले, शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता, तो चाळीस वर्षापर्यंत राजा होता. नंतर देवाने शौलाला काढून टाकले, देवाने दावीदाला त्यांचा राजा केले, दावीदाविषयी देव असे बोलला इशायाचा पुत्र, दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील. याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला, तो वंशज येशू आहे, देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते.

प्रेषि. 13:1-23 साठी चलचित्र