YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमु. 23:8-17

2 शमु. 23:8-17 IRVMAR

दावीदाच्या पदरी असलेल्या वीरांची नावे अशी: योशेब-बश्शेबेथ तखमोनी हा रथावरच्या सेवकांचा मुख्य होता. असनी आदीनो म्हणूनही त्यास ओळखतात. त्याने एका वेळी आठशे जणांना ठार केले. त्याच्या खालोखाल अहोही येथील दोदय याचा मुलगा. एलाजाराने पलिष्ट्यांना आव्हान दिले त्यावेळी दावीदाबरोबर असलेल्या तीन वीरांपैकी हा एक. ते युध्दाच्या तयारीने आले, पण इस्राएल सैनिक पळून गेले होते. थकून अंगात त्राण राहिला नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवारीला हात चिकटेपर्यंत त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते लोक तिथे आले. हरार येथील आगे याचा मुलगा शम्मा हा ही होता. पलिष्टी चालून आले तेव्हा एका कडधान्याच्या शेतात हे युध्द झाले. लोकांनी पलिष्ट्यां समोरून पळ काढला. पण शम्मा शेताच्या ऐन मध्यावर उभा राहिला आणि त्याने एकट्याने त्यांना तोंड दिले. त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. परमेश्वराने इस्राएलाला त्यादिवशी मोठा विजय मिळवून दिला. दावीद एकदा अदुल्लामच्या गुहेत होता आणि पलिष्टी सैन्याचा तळ खाली रेफाईच्या खोऱ्यात होता. त्यावेळी तीस शूरांपैकी तिघेजण दावीदाकडे जायला म्हणून सरळ गुहेपर्यंत अक्षरश: सरपटत गेले. नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती. दावीद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला तो म्हणाला, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल. पण या तीन शूरांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यातून धाडसाने तोंड देत मार्ग काढला आणि बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी काढून दावीदाला प्यायला आणून दिले. दावीदाने ते प्यायचे नाकारले. त्याने ते परमेश्वरास अर्पण म्हणून जमिनीवर ओतून दिले. दावीद म्हणाला, “परमेश्वरा, हे पाणी मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल.” म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली.