2 शमु. 20
20
शबाचे बंड
1शबा नावाचा एक मनुष्य तेथे होता. हा बिक्रीचा मुलगा. बन्यामीन घराण्यातील हा शबा अगदी कुचकामी पण खोडसाळ प्रवृत्तीचा होता. त्याने एकदा रणशिंग फुंकले आणि लोकांस गोळा केले. आणि त्यांना म्हणाला, दावीदाकडे आपला भाग नाही. या इशायच्या मुलात आपला वाटा नाही. इस्राएलींनो, आपापल्या डेऱ्यात परत चला. 2हे ऐकून सर्व इस्राएल लोक दावीदाला सोडून बिक्रीचा मुलगा शबा याच्या मागे गेले. पण यहूदी लोक मात्र यार्देन नदीपासून यरूशलेमपर्यंत राजाच्या पाठीशी राहिले. 3दावीद यरूशलेम येथील आपल्या घरी परतला. आपल्या दहा दासींना त्याने घराच्या निगराणीसाठी मागे ठेवले होते त्यांना त्याने एका खास घरात ठेवले. आणि त्यांच्यावर पहारा ठेवला. मरेपर्यंत या स्त्रिया तेथेच राहिल्या दावीदाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी नीट व्यवस्था केली पण पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची स्थिती विधवेसारखी होती. 4राजा अमासास म्हणाला, यहूदाच्या लोकांस तीन दिवसात येऊन मला भेटायला सांग. त्यावेळी तूही बरोबर राहा. 5तेव्हा अमासा यहूद्यांना बोलवून आणायला रवाना झाला. पण राजाने सांगितल्यापेक्षा जास्त वेळ त्यास लागला. 6दावीद अबीशयला म्हणाला, अबशालोमापेक्षाही हा बिक्रीचा मुलगा शबा आपल्या दृष्टीने धोकादायक आहे. तेव्हा माझ्या हाताखालच्यांना घेऊन त्याचा पाठलाग कर. तटबंदी असलेल्या नगरात तो जायच्या आधीच त्यास गाठायला हवे. एकदा तो मजबूत बंदोबस्त असलेल्या नगरात शिरला की त्यास पकडणे अवघड जाईल. 7तेव्हा यवाब, बिक्रीचा मुलगा शबा याच्या पाठलागासाठी यरूशलेमेहून निघाला. त्याने बरोबर आपली माणसे, करेथी, पलेथी तसेच इतर सैनिक घेतले. 8यवाब आणि त्याचे सैन्य गिबोनजवळच्या मोठ्या पहाडापाशी आले तेव्हा अमासा त्यांना सामोरा आला. यवाबाच्या अंगावर चिलखत होते. त्याने कमरबंद बांधला होता आणि म्यानात तलवार होती. यवाब आमासाच्या दिशेने चालू लागला तेव्हा त्याची तलवार म्यानातून निसटून पडली. यवाबाने ती उचलली आणि हातात धरली. 9त्याने अमासास विचारले, तुझे सर्व कुशल आहे ना? आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरून त्यास पुढे खेचले. 10यवाबाच्या डाव्या हातातील तलवारीकडे अमासाचे लक्ष नव्हते. पण तेवढ्यात यवाबाने अमासाच्या पोटात तलवार खुपसली, आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. यवाबाला पुन्हा वार करावा लागलाच नाही. अमासा गतप्राण झाला. यवाब आणि त्याचा भाऊ अबीशय यांनी बिक्रीचा मुलगा शबा याचा शोध चालूच ठेवला. 11यवाबाच्या सैन्यातील एक तरुण सैनिक अमासाच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “यवाब आणि दावीदाला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी यवाबामागे जावे.” 12अमासा रस्त्याच्या मध्याभागी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून हे दृष्य पाहतोय हे त्या तरुण सैनिकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने ते प्रेत रस्त्यावरून ढकलत शेतात नेऊन टाकले. त्याच्यावर एक कापड अंथरले. 13अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले. मग त्यांनी यवाबाबरोबर बिक्रीचा पुत्र शबा याचा पाठलाग सुरू केला. 14इस्राएलांच्या सर्व वंशांमधून जाऊन, शबा आबेल व बेथ माका येथे गेला. सर्व बेरीही एकत्र येऊन शबाला मिळाले. 15यवाब आपल्या मनुष्यांसहीत आबेल-बेथ-माका येथे पोचला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. तटबंदीभोवती त्यांनी माती कचऱ्याचा ढीग रचला. त्याच्यावरून भिंत पार करणे त्यांना सोयीस्कर ठरले असते. त्याचबरोबर त्यांनी भिंत पाडण्यासाठी भिंतीतील दगड फोडायला सुरुवात केली. 16नगरात एक चाणाक्ष स्त्री राहत होती. तिने नगरातून मोठ्याने ओरडून सांगितले, “माझे ऐका. यवाबाला येथे यायला सांगा. मला त्याच्याशी काही बोलायचे आहे.” 17यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्यास तूच यवाब का, म्हणून विचारले. यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, माझे ऐक. यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.” 18मग ती स्त्री म्हणाली, “पूर्वी लोक म्हणत, गरज पडली की आबेलमध्ये यावे, म्हणजे मागाल ते मिळते.” 19इस्राएलमधील शांतताप्रिय, विश्वासू लोकांपैकी मी एक आहे. इस्राएलच्या एका महत्वाच्या शहराची तुम्ही नासधूस करत आहात. परमेश्वराच्या मालकीच्या वस्तूची तुम्ही मोडतोड का करता? 20यवाब म्हणाला, “मला कशाचाच नाश करायची इच्छा नाही. तुमच्या नगराची नासधूस मी करू इच्छित नाही.” 21पण एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील बिक्रीचा पुत्र शबा नावाचा एक मनुष्य तुमच्या नगरात आहे. दावीद राजाविरुध्द त्याने बंड केले आहे. त्यास माझ्यापुढे हजर केलेत तर नगराला धक्कालावणार नाही. तेव्हा ती स्त्री यवाबाला म्हणाली, ठीक आहे. त्याचे मुंडके भिंतीवरून तुझ्याकडे टाकण्यात येईल. 22मग तिने गावातील लोकांस शहाणपणाने आपले म्हणणे पटवून दिले. तेव्हा लोकांनी बिक्रीचा पुत्र शबा याचे मुंडके धडावेगळे करून ते यवाबाकडे तटबंदी पलीकडे फेकले. यवाबाने रणशिंग फुंकले आणि सैन्याने नगर सोडले. जो तो आपल्या घरी परतला आणि यवाब यरूशलेम येथे राजाकडे आला.
दाविदाचे अंमलदार
23यवाब इस्राएलचा सेनापती होता. यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. 24अदोराम हा कष्टकरी लोकांचा प्रमुख होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता. 25शबा चिटणीस होता. सादोक आणि अब्याथार हे याजक होते. 26आणि याईरी ईरा हा दावीदाचा मुख्य सेवक होता.
सध्या निवडलेले:
2 शमु. 20: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.