2 राजे 17
17
शोमरोनाचा पाडाव आणि इस्त्राएलाचा बंदिवास
1यहूदाचा राजा आहाज याच्या बाराव्या वर्षी एलाचा मुलगा होशे शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने नऊ वर्षे राज्य केले. 2परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच तो करत असे, पण त्याच्या पूर्वीच्या इस्राएलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती. 3अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करून आला. तेव्हा होशे त्याचा दास बनला आणि त्याने त्यास खंडणी भरून दिली. 4पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी होशेने खंडणीही दिली नव्हती. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्यास अटक करून कैदेत टाकले. 5मग अश्शूरचा राजा सर्व देशावर चाल करून आला व शोमरोनावर चढून येऊन त्याने शोमरोनला तीन वर्षे वेढा घातला. 6होशेच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले आणि इस्राएल लोकांस त्याने कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि माद्य लोकांच्या नगरात ठेवले. 7परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती, म्हणून असे घडले. कारण इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वर त्यांचा देव ज्याने त्यांना मिसरचा राजा फारो याच्या जाचातून सोडवले होते, त्याच्याविरुध्द पाप केले आणि दुसऱ्या देवांचे भजन पूजन केले. 8आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्राएली लोकांपुढून हुसकावून लावली होती, त्यांच्या नियमांप्रमाणे आणि इस्राएलाच्या राजांनी जे नियम केले होतो त्याप्रमाणे ते चालत. 9इस्राएल लोकांनी ज्या गोष्टी चांगल्या नाहीत त्या त्यांनी परमेश्वर देवाविरुध्द चोरुन केल्या. पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या नगरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थाने बांधली. 10प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतीस्तंभ आणि अशेरा देवीचे खांब उभारले. 11आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्या समोरून घालवून दिली होती, त्यांच्यासारखेच त्यांनी उंचस्थानावर धूप जाळला आणि परमेश्वरास संताप येईल आशाप्रकारची वाईट कामे केली. त्या नीच कृत्यांनी परमेश्वराचा राग भडकला. 12त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “त्यांची सेवा कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते. 13इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे सांगितले होते की, “या वाईट मार्गातून फिरा आणि जे नियम तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिले होते व जे मी माझे सेवक आणि भविष्यवादी यांच्याकडून तुम्हास पाठवून दिले, त्या सर्वांप्रमाणे माझ्या आज्ञा व माझे नियम पाळा.” 14पण त्यांनी काही एकले नाही. उलट आपल्या पूर्वजांसारखाच, ज्यांचा परमेश्वर आपला देव याच्यावर विश्वास नव्हता हट्टीपणा केला. 15परमेश्वराचा करार आणि त्याचा नियम जो त्याने त्यांच्या पूर्वजांशी केला होता व त्याच्या साक्षी ज्या त्याने त्यांना साक्ष देऊन दिलेल्या होत्या, त्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते निरर्थक होऊन व्यर्थतेच्या मागे लागले. त्यांनी आपल्या भोवतालची राष्ट्रे ज्याच्याविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांस आज्ञा केली होती की, त्यांच्यासारखे करू नका त्यांच्यामागे ते चालले होते. 16आणि त्यांनी परमेश्वर आपला देव याच्या सर्व आज्ञा सोडून, त्यांनी वासरांच्या दोन मूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आणि आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बआलदेवतेची त्यांनी पूजा केली. 17त्यांनी आपल्या मुला व मुलींना ही अग्नीत होम करून अर्पिली. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि ज्योतिषी यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वत:लाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला. 18म्हणून परमेश्वर इस्राएलवर फार संतापला आणि त्याने त्यांना आपल्यासमोरून घालवले, फक्त यहूदा वंश सोडून कोणी उरले नाही. 19यहूदाने देखील परमेश्वर आपला देव याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. याउलट इस्राएलांनी जे नियम केले त्याचे त्यांनी अनुसरण केले. 20त्यामुळे परमेश्वराने सर्व इस्राएल वंशजांचा त्याग केला व त्यांना आपणासमोरून हाकलून दृष्टीआड करेपर्यंत, त्याने त्यांना पीडा देऊन लुटारुंच्या हाती दिले. 21त्याने दाविदाच्या घराण्यापासून इस्राएल फाडून काढला, तेव्हा त्यांनी नबाटचा मुलगा यराबाम याला राजा केले. यराबामाने इस्राएलाला परमेश्वराच्या मागे चालण्यापासून परावृत्त केले आणि त्यांना मोठे पाप करायला लावले. 22यराबामाने जी पापे केली त्याचे अनुकरण इस्राएल लोकांनी केले. त्यांनी ते सोडले नाही. 23अखेर परमेश्वराने आपले सर्व सेवक जे भविष्यवादी होते त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या समोरून घालवले. त्यांना त्यांच्या प्रदेशातून काढून अश्शूरमध्ये नेण्यात आले. आजपर्यंत ते तेथे आहेत.
शोमरोनात नवी वसाहत
24अश्शूरच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनात इस्राएली लोकांच्या ठिकाणी वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले. 25आणि असे झाले की ते तेथे वस्ती करून राहू लागले, तेव्हा ते परमेश्वराचा मान राखत नव्हते. म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह सोडले. त्यांनी त्यांच्यातील कित्येकांचा बळी घेतला. 26मग ते अश्शूरच्या राजाला म्हणाले, “जी राष्ट्रे तू नेऊन शोमरोनमधल्या नगरात वसवले, त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. आणि पाहा, सिंह त्या लोकांस मारून टाकत आहे, कारण त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम माहित नाही.” 27तेव्हा अश्शूरच्या राजाने आज्ञा दिली, “जे याजक तुम्ही तेथून आणले आहेत, त्यातील कोणाएकाला तिथे घेऊन जा. आणि त्यास तिथे राहू द्यावे व त्यांनी त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम शिकवावा. 28तेव्हा, शोमरोनमधून जे याजक त्यांनी नेले होते, त्यापैकी एकजण बेथेल येथे राहिला. आणि त्याने लोकांस परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.” 29परंतू प्रत्येक राष्ट्राने स्वत:चे देव केले, आणि त्यांना शोमरोन मधील लोकांनी बांधलेल्या उंचस्थानावरील पूजास्थळामध्ये ठेवले. प्रत्येक राष्ट्राने स्वत:च्या राहण्याच्या नगरात असेच केले. 30बाबेल लोकांनी सुक्कोथ-बनोथ ही दैवते केली; कूथातील लोकांनी नेरगल केला; हमाथमधील लोकांनी अशीमा केली, 31अव्वी यांनी निभज आणि तर्ताक केले. सफरवाईम यांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक यांच्यासाठी आपल्या मुलांचा अग्नीत बली दिला. 32ते परमेश्वराविषयी आदर बाळगत तरी, उंचस्थानातील पूजास्थळांसाठी त्यांनी आपल्यातूनच याजक निवडले. तिथे हे याजक यज्ञ करीत. 33ते परमेश्वराविषयी आदर बाळगत असत आणि आपापल्या दैवतांचीही पूजा करीत. आपल्या पूर्वीच्या राष्ट्रा प्रमाणे जेथून त्यांना आणले होते त्यांच्या रीतीप्रमाणे ते करीत गेले. 34आजही ते लोक त्यांच्या पूर्वीच्या चालीरीतीला चिटकून आहेत. ते परमेश्वराचा आदर बाळगत नसत व ज्याचे नाव इस्राएल ठेवले, त्या याकोबाच्या वंशजास त्याने दिलेल्या आज्ञा, नियम, न्याय व नियमशास्त्र यांप्रमाणे ते आचरण करीत नाही. 35परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार करून त्यांना आज्ञा केली होती की, “इतर दैवतांचे भय तुम्ही धरू नका, आणि त्यांच्या पाया ही पडू नका व त्यांची सेवाही करू नका व त्यांना यज्ञ करू नका. 36फक्त परमेश्वर देवालाच मानले पाहिजे त्यानेच तुम्हास मिसरमधून बाहेर काढले तुमच्या रक्षणासाठी परमेश्वराने आपले सामर्थ्य पणाला लावले. तेव्हा परमेश्वराची उपासना करा आणि त्याच्यासाठी यज्ञ करा. 37त्याने तुम्हास ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांचे भय धरता कामा नये. 38मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका. 39फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हास सर्व संकटातून सोडवील.” 40पण इस्राएल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले. 41आता ती इतर राष्ट्रे परमेश्वराचा आदर ठेवतात पण स्वत:च्या देवतांच्या मूर्तीचीही पूजा करतात. त्यांची मुलेबाळे, नातवंडे आपल्या पूर्वजांचेच अनुकरण करत राहिली. ती आजतागायत तशीच वागत आहेत.
सध्या निवडलेले:
2 राजे 17: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.