YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 10:1-17

2 राजे 10:1-17 IRVMAR

शोमरोनात अहाबाला सत्तर पुत्र होते. शोमरोनातील अधिकारी आणि वडिलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. व इज्रेलच्या अधिकाऱ्यांना तसेच ज्यांनी या अहाबाच्या मुलांना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले. “हे पत्र मिळाल्यावर तुमच्या धन्याच्या मुलांपैकी जो सगळ्यात गुणी आणि लायक मुलगा असेल त्याची निवड करा. रथ, घोडे इत्यादी तुमच्याजवळ आहेच. तुमचे वास्तव्यही मजबूत शहरात आहे. तुमच्याकडे शस्त्रास्त्रे आहेत. तुम्ही ज्या मुलाची निवड कराल तो उत्तम व योग्य असेल त्यास त्याच्या वडिलाच्या सिंहासनावर बसवा. मग आपल्या धन्याच्या घराण्यासाठी लढा द्या.” पण हे वाचून ती अधिकारी आणि वडिलधारी मंडळी फारच घाबरली. ते सर्व म्हणाले, “योराम आणि अहज्या हे दोन राजे सुद्धा येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्यास अडवणार?” मग, अहाबाच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडिलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.” येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यामध्ये त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबाच्या मुलांचा शिरच्छेद करा. साधारण याच वेळेला इज्रेल येथे त्यांना माझ्याकडे आणा.” अहाब राजाची सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते. या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या राजाच्या सर्व सत्तर राजपुत्रांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या येहूकडे इज्रेल याठिकाणी पाठवल्या. निरोप्याने येऊन येहूला सांगितले, “या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत.” त्यास येहू म्हणाला, “नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे दोन ढीग करून सकाळपर्यंत तिथे ठेवा.” सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्ही निरपराध आहात. मी माझ्या धन्याविरुध्द कट रचून त्यास ठार केले. पण अहाबाच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत. परमेश्वर बोलतो त्याप्रमाणेच सर्व घडते हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. अहाबाच्या कुटुंबाबद्दल परमेश्वराने एलीयाकडून वदविले होते. आता परमेश्वराने आपण ज्या गोष्टी करु म्हणून सांगितले होते त्या सर्व करून दाखवल्या आहेत.” आणि येहूने इज्रेलमधल्या अहाबाच्या सर्व कुटुंबियांना ठार केले. सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र याजक यांची त्याने हत्या केली. अहाबाच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही. इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला. यहूदाचा राजा अहज्या याच्या नातेवाईकांना तो भेटला. येहूने त्यांची चौकशी केली, “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले, “आम्ही यहूदाचा राजा अहज्या याचे नातेवाईक. राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत.” तेव्हा येहू आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.” तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ-एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वांना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही. तिथून निघाल्यावर येहूला रेखाबाचा मुलगा योनादाब भेटला. तो येहूला भेटायलाच निघाला होता. येहूने त्याचे कुशल विचारुन म्हटले, “मी तुझा विश्वासू मित्र आहे, तसाच तूही आहेस ना?” यहोनादाब म्हणाला, “होय, मी तुझा विश्वासू मित्र आहे.” येहू म्हणाला, “तसे असेल तर मला तुझा हात दे.” आणि येहूने त्याचा हात धरुन त्यास आपल्या रथात घेतले. येहू योनादाबाला म्हणाला, “चल माझ्याबरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कंठा आहे ती बघ.” तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला. शोमरोनला पोहोचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबिय अजून जिवंत होते त्या सर्वांना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले.