YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इति. 7:11-22

2 इति. 7:11-22 IRVMAR

परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्याबाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या. नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला, “शलमोना तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे. कधी जर पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा माझ्या लोकांमध्ये रोगाराईचा प्रसार केला आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला उत्तर देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन. आता माझी दृष्टी याठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत. हे मंदिर मी माझे म्हणून निवडले आहे माझे नाव येथे सदासर्वकाळ रहावे म्हणून मी हे स्थान पवित्र केले आहे माझी दृष्टी आणि माझे चित्त नेहमी या मंदिराकडे लागलेले असेल. शलमोना, तुझे पिता दावीद यांच्या प्रमाणेच तू माझ्याशी वागलास, माझ्या आज्ञांचे पालन केलेस, माझे विधी आणि नियम पाळलेस, तर मी तुला समर्थ राजा बनवील आणि तुझे राज्य महान होईल. तुझे पिता दावीद यांना मी तसे वचन दिले आहे. त्यांना मी म्हटले होते, ‘दावीद तुझ्या घराण्यातील पुरुषच इस्राएलाच्या राजपदावर आरुढ होईल.’ पण जर माझ्या आज्ञा आणि नियम तू पाळले नाहीस. इतर दैवतांची उपासना व सेवा केलीस, तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएल लोकांस मी हुसकावून लावीन. माझ्या नावाप्रीत्यर्थ असलेले हे पवित्र मंदिर मी सोडून जाईन. इतकेच नव्हे तर त्यांना मी देशामध्ये निंदेचा विषय करीन. एकेकाळी पूज्य मानल्या गेलेल्या या मंदिरावरुन जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला आता आश्चर्य वाटेल. ते लोक म्हणतील, ‘हा प्रदेश आणि हे मंदिर यांची अशी अवस्था परमेश्वराने का केली बरे?’ तेव्हा त्यांना इतर लोक सांगतील, ‘कारण आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे या इस्राएल लोकांनी ऐकले नाही. या लोकांस या परमेश्वरानेच मिसरातून बाहेर आणले. तरी हे इतर दैवतांच्या भजनी लागले. त्यांनी त्यांची उपासना व सेवा केली. त्यांनी मूर्तीपूजा सुरु केली. म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराने हे अरिष्ट आणले.’”