YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इति. 20:1-16

2 इति. 20:1-16 IRVMAR

यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनी लोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटाला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करून येत आहे. ती हससोन-तामार!” म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा. यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वरास काय करावे, असे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली. तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले. यहोशाफाट, परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांमध्ये तो उभा राहिला. तो म्हणाला, “आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रामधल्या सर्व राज्यांचा तूच शास्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही.” तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलादेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस. अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाकरिता त्यांनी मंदिर बांधले. ते म्हणाले, तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे, “संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु, आमची हाक ऐकून तू आम्हास सोडव.” “पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेईर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांस तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही. पण तेव्हाच त्यांच्या नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हास आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हास बहाल केला आहेस. हे देवा, या लोकांस चांगले शासन कर. आमच्यावर चाल करून येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हास काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे.” यहूदातील सर्व मंडळी आपल्या पत्नी आणि तान्ह्या मुलांसकट सर्व अपत्यांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती. तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा पुत्र. जखऱ्या बनायाचा पुत्र. बनाया यईएलाचा पुत्र. आणि यईएल मत्तन्याचा पुत्र. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरूशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे. उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल.