1 शमु. 2
2
हन्नाचे गीत
लूक 1:46-55
1मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली,
“माझे मन परमेश्वराच्या ठायी आनंद पावत आहे;
माझे शिंग परमेश्वराच्या ठायी उंच केले आहे;
माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे,
कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदीत होत आहे.
2परमेश्वरासारखा कोणी पवित्र नाही,
कारण तुझ्या शिवाय कोणी नाही,
आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही,
3अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका;
तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो.
कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे;
त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात.
4पराक्रमी पुरूषांची धनुष्ये मोडलेली आहेत,
परंतू जे अडखळले त्यांनी बलरूप कमरबंद वेष्टीला आहे.
5जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत;
आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत.
वांझ होती तिने सात मुलांस जन्म दिला आहे,
परंतु फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे.
6परमेश्वर जिवे मारतो व जिवनात आणतो.
तो अधोलोकास नेतो व वर आणतो.
7परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो.
तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो.
8तो गरीबाला धुळीतून वर उठवतो;
तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो;
यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे
आणि त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे.
कारण पृथ्वीचे खांब परमेश्वराचे आहेत;
त्याने त्यावर जग ठेवले आहे.
9तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे पाय संभाळील,
परंतु दुष्ट अंधारात शांत ठिकाणी ठेवले जातील,
कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही.
10देवाशी विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केले जातील;
आकाशांतून तो त्यांच्याविरुध्द मेघगर्जना करील.
परमेश्वर पृथ्वीच्या शेवटल्या टोकावर असलेल्यांचा न्याय करील;
तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करील.”
11मग एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला. आणि तो लहान मुलगा एली याजकासमोर परमेश्वराची सेवा करू लागला.
एलीच्या घराण्याविरुद्ध भविष्य
12एलीची मुले नालायक माणसे होती; ते परमेश्वरास ओळखत नव्हते. 13लोकांच्या बाबतीत याजकांची अशी रीत होती की कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करू लागला की, मांस शिजत असतानाच याजकाचा चाकर मांस उचलण्यासाठी तीन अणकुचीदार टोकाचा काटा आपल्या हातात घेऊन येई 14तो परातीत किंवा पातेल्यांत किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा घुसवत असे आणि तो काटा जे सर्व धरून काढी, ते याजक आपणासाठी घेई. जे इस्राएली लोक शिलो येथे येत त्या सर्वांना ते तसेच करत असत 15त्यांनी चरबी जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की, “याजकासाठी मांस भाजण्यास दे कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर फक्त कच्चे घेईल.” 16जर त्या मनुष्याने त्यास असे म्हटले की, “अगोदर ते चरबी जाळतील मगच तुला पाहिजे तेवढे तू घे” तर तो म्हणे असे नाही, “पण तू आताच दे नाही तर मी ते बळजबरीने घेईन.” 17हे त्या तरुणाचे पाप परमेश्वराच्यासमोर फार मोठे होते कारण त्यामुळे देवासाठी अर्पण आणण्याचा लोकांस तिरस्कार वाटू लागला. 18परंतु शमुवेल बाळ तर तागाचे वस्त्र एफोद घालून देवाची सेवा करीत होता. 19त्याची आई त्याच्यासाठी लहान अंगरखा करीत असे आणि प्रत्येक वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करावयास येई त्यावेळी त्यास तो देत असे. 20एलकानाला व त्याच्या पत्नीला एली आशीर्वाद देऊन म्हणत, “असे या पत्नीपासून परमेश्वर तुला संतान देवो” कारण जे तिने देवाकडे विनंती करून मागितले त्यास परत दिले मग ते आपल्या घरी जात असत. 21आणि परमेश्वराने हन्नेला पुन्हा मदत केली ती गरोदर झाली. तिने तीन मुलांना व दोन मुलींना जन्म दिला दरम्यानच्या काळात शमुवेल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. 22आता एली फार म्हातारा झाला होता आणि आपले पुत्र सर्व इस्राएलाशी कसे वागले आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशदाराजवळ ज्या स्त्रिया सेवा करीत त्यांच्यापाशी ते कसे निजले हे सर्व त्याने ऐकले. 23तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशी कृत्ये का करता? कारण तुमची वाईट कृत्ये या सर्व लोकांपासून मी ऐकली आहेत. 24माझ्या मुलांनो असे करू, नका कारण जी बातमी मी ऐकतो ती चांगली नाही; तुम्ही परमेश्वराच्या लोकांस आज्ञाभंग करायला लावता. 25जर कोणी एक पुरुष दुसऱ्याविरूद्ध पाप करील तर परमेश्वर त्याचा न्याय करील. पण जर पुरुष परमेश्वराच्या विरूद्ध पाप करील तर त्यासाठी कोण मध्यस्थी करेल?” पण ते आपल्या बापाचे शब्द ऐकेनात कारण त्यांना जिवे मारावे असा देवाचा हेतू होता. 26शमुवेल बाळ हा मोठा झाला आणि परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. 27आता देवाचा एक पुरुष एलीकडे येऊन त्यास म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या पूर्वजांचे घराणे मिसरात फारोच्या दास्यात राहत असता मी त्यास प्रगट झालो नाही काय? 28आणि त्याने माझा याजक व्हावे माझ्या वेदीकडे धूप जाळायला वरती जावे माझ्यासमोर एफोद धारण करावे म्हणून मी त्यास सर्व इस्राएलाच्या वंशातून निवडून काढले नाही काय? आणि इस्राएलाच्या लोकांनी अग्नीतून केलेली सर्व अर्पणे मी तुझ्या पूर्वजांच्या घराण्याला दिली नाहीत काय? 29तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे राहतो तिथे आज्ञापिले आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्राएलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस? 30यामुळे इस्राएलांचा परमेश्वर म्हणतो, की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे; परंतु आता परमेश्वर असे म्हणतो, ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो कारण जे माझा आदर करतात त्यांचा आदर मी करीन आणि जे मला तिरस्कार करतात त्यांचा अवमान होईल. 31पाहा असे दिवस येत आहे की, ज्यात मी तुझे सामर्थ्य व तुझ्या वडिलाच्या घराण्याचे सामर्थ्य कापून टाकीन आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही. 32जरी इस्राएलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्या जागी दुःख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्वकाळ कधी कोणी म्हातारा होणार नाही. 33आणि तुझा जो पुरुष मी आपल्या वेदीपासून काढून टाकणार नाही, त्यास जिवंत राखले जाईल यासाठी की, तो तुझे डोळे क्षीण करणारा व तुझ्या मनाला खेद देणारा होईल. आणि तुझ्या घराण्याची सर्व संतती ऐन तरुणपणात मरेल. 34आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास यांच्यावर जे येईल तेच तुला चिन्ह होईल; ते दोघेही एकाच दिवशी मरतील. 35मी आपणासाठी विश्वासू याजक उभा करीन; तो माझ्या मनात व माझ्या मनांत जे आहे त्याप्रमाणे करील. मी त्याचे घराणे निश्चित स्थापीन; आणि तो माझ्या अभिषिक्त राजासमोर निरंतर चालेल. 36असे होईल की तुझ्या घराण्यातील प्रत्येक जण जो कोणी राहिलेला आहे तो येऊन रुप्याच्या तुकड्यासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यापुढे नमन करील आणि म्हणेल की, मी तुला विनंती करतो मला भाकरीचा तुकडा खाण्यास मिळावा म्हणून मला याजकपदातले एखादे काम दे.”
सध्या निवडलेले:
1 शमु. 2: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.