त्याने आपली काठी हातात घेऊन ओहाळातून पाच गुळगुळीत गोटे आपल्यासाठी निवडून घेतले आणि त्याने त्याच्याजवळ जी मेंढपाळाची पिशवी होती, तीच्यात ते ठेवले व आपली गोफण हातात घेऊन पलिष्ट्याजवळ तो जाऊ लागला. तो पलिष्टी चालत चालत दावीदाजवळ आला आणि जो मनुष्य ढाल वाहत होता तो त्याच्या पुढे चालला. त्या पलिष्ट्याने दृष्टी लावून दावीदाला पाहिले, तेव्हा त्याने त्यास तुच्छ मानिले कारण की, तो कोवळा तरुण, तांबूस व सुंदर चेहऱ्याचा होता. तेव्हा तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे? म्हणून काठी घेऊन माझ्याकडे आलास?” त्या पलीष्ट्याने दावीदाला आपल्या परमेश्वराच्या नावाने शाप दिला. त्या पलिष्टयाने दावीदाला म्हटले, “माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुझे शरीर आकाशातील पाखरांना आणि रानातील वनपशूंना देतो.” दावीदाने पलिष्ट्याला म्हटले, “तू तलवार, भाला व ढाल घेऊन मजवर आलास, परंतु मी सैन्यांचा परमेश्वर इस्राएलाच्या सैन्यांचा परमेश्वर ज्याची निंदा तू केली, त्याच्या नावाने तुझवर येत आहे. परमेश्वर या दिवशी तुला माझ्या हाती देईल. मी तुला जीवे मारीन आणि तुझे मस्तक छेदिन आणि पलिष्ट्यांच्या सैन्यांची प्रेते आकांशातील पाखरे व रानातील वनपशू यांस देईन. तेव्हा अवघी पृथ्वी जाणेल की, इस्राएलामध्ये परमेश्वर आहे. हा सर्व समुदाय जाणेल की, तलवार व भाला याकडून परमेश्वर संरक्षण करीत नाही. कारण लढाई परमेश्वराची आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल.” मग असे झाले की, तो पलिष्टी उठून दावीदा जवळ येत असता दावीदाने घाई करून पलिष्टयाला मारण्यास शत्रूच्या सैन्याकडे धावला. दावीदाने आपला हात पिशवीत घालून त्यातून एक गोटा काढून गोफणीने मारिला, आणि तो दगड त्या पलिष्ट्याच्या कपाळात शिरून तो जमिनीवर पालथा पडला. असे करून दावीदाने गोफण व दगड यांनी पलिष्ट्याला जिंकले आणि त्याचा पराभव करून त्यास मारिले. परंतु दावीदाच्या हाती तलवार नव्हती. तेव्हा दावीद धावत जाऊन त्या पलिष्ट्यावर उभा राहिला आणि त्याचीच तलवार त्याच्या म्यानातून काढिली आणि तिच्याने त्याचे मुडंके कापून त्यास ठार मारले. मग आपला युद्धवीर मेला आहे हे पाहून पलिष्टी पळाले. तेव्हा इस्राएल व यहूदीयांच्या मनुष्यांनी उठून आरोळी मारली, आणि खोऱ्यापर्यंत व एक्रोनाच्या वेशीपर्यंत ते पलिष्ट्यांच्या पाठीस लागले. पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोनापर्यंत जखमी होऊन पडले. मग इस्राएलाची संताने पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारे आली आणि त्यांनी त्यांची छावणी लुटली. दावीदाने त्या पलिष्ट्याचे डोके घेऊन यरूशलेमेत आणले, पण त्याची शस्त्रे आपल्या तबूंत ठेवली. शौलाने दावीदाला त्या पलिष्ट्यांस लढण्यास जाताना पाहिले तेव्हा त्याने अबनेर सेनापती ह्याला म्हटले, “हे अबनेरा तो तरुण कोणाचा पुत्र आहे?” मग अबनेराने म्हटले, “हे राजा तुझ्या जिवाची शपथ मला माहीती नाही.” तेव्हा राजाने म्हटले, “तो तरुण कोणाचा पुत्र आहे याची विचारपूस कर?” त्या पलिष्ट्याला वधल्यानतंर दावीद परत आला तेव्हा अबनेराने त्यास घेऊन शौलाजवळ आणले. त्या पलिष्ट्याचे डोके त्याच्या हाती होते. तेव्हा शौलाने त्यास म्हटले, “हे तरुणा तू कोणाचा पुत्र आहेस?” मग दावीदाने म्हटले, “तुमचा दास इशाय बेथलहेमकर याचा मी पुत्र आहे.”
1 शमु. 17 वाचा
ऐका 1 शमु. 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 शमु. 17:40-58
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ