YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 6:14-38

1 राजे 6:14-38 IRVMAR

शलमोनाने मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले. मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती. मंदिराच्या आत मागच्या बाजूला वीस हात लांबीचा परमपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या. मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. त्याची लांबी चाळीस हात होती. हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंतीच्या दगडाचे काहीच दर्शन होत नव्हते. या लाकडावर उमललेली फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीव काम केलेले होते. आणखी मागे मंदिराच्या अंतर्भागात शलमोनाने परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी गाभारा करवून घेतला होता. याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढविलेला होता. गंधसरुची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवलेली होती. शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोसुद्धा सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या. परमपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवून त्याने काम समाप्त केले. कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी दहा दहा हात होती. ते परमपवित्र गाभाऱ्यात ठेवले. करुबाचा एक पंख पाच हात व दुसरा पंख पाच हात होता. एका पंखाच्या टोकापासून दुसऱ्या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते. दुसरा करुबही दहा हात उंच होतो; दोन्ही करुब एका मापाचे व एका आकाराचे होते. आणि एका करुबाची उंची दहा हात होती, दुसऱ्या करुबाचीही तेवढीच होती. हे करुब देवदूत आतल्या परमपवित्र गाभाऱ्यात बसवले होते. ते एकमेकांना लागून असे ठेवले होते की त्यांचे पंख खोलीच्या बरोबर मध्यभागी एकमेकांना भिडत होते. आणि बाहेरच्या बाजूला भिंतीच्या कडेला स्पर्श करत होते. हे करुब सोन्याने मढवले होते. दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेली होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती. दोन्ही खोल्यांची जमीन आतली व बाहेरील सोन्याने मढवली होती. शलमोनाने जैतूनाच्या लाकडाचे दरवाजे करून ते परमपवित्र गाभाऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून लावले. दारांभोवतालच्या बाह्या व कपाळपट्टी यांनी भिंतीचा पाचवा भाग व्यापला होता. जैतून लाकडाच्या या दारांवर करुब देवदूत, खजुरीची झाडे आणि फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती. त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाच्या चौकटी बसवल्या होत्या; त्याने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता; त्याचे दोन दरवाजे देवदारू लाकडाचे होते प्रत्येक दरवाज्याला दोन दोन दुमटण्या होत्या. त्यावरही पुन्हा करुब, खजुरीची झाडे, उमलेली फुले यांचे कोरीव काम असून ती दारे सोन्याने मढवली होती. मग त्याने आतले अंगण बाधले. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि गंधसरुची एक ओळ अशा त्या होत्या. वर्षाचा चौथा महिना जीव मध्ये त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला. अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजेच वर्षाच्या आठव्या महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. शलमोनाला मंदिर बांधायला सात वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम नियोजित नमुन्या प्रमाणे तंतोतंत झाले.