1 राजे 13
13
यहूदा येथील संदेष्टा यराबामाला ताकीद देतो
1परमेश्वराने आपल्या एका संदेष्ट्याला (देवाच्या मनुष्यास) यहूदाहून बेथेल नगरीला पाठवले. तो तेथे पोहोंचला तेव्हा राजा यराबाम वेदी पुढे धूप जाळत होता. 2परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे दाविदाच्या कुळात योशीया नावाचा पुत्र जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.” 3हे निश्चित घडेल, अशी संदेष्ट्याने लोकांस खूण दिली. तो म्हणाला, “परमेश्वराने सांगितले त्याची ही साक्ष ही वेदी तडकेल आणि तिच्यावरची राख खाली ओघळेल, असे परमेश्वराने सांगितले आहे.” 4राजाने जेव्हा देवाच्या मनुष्याचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेल येथे ऐकले. तेव्हा यराबामाने वेदीवरील आपला हात उचलून त्या मनुष्याकडे निर्देश करत म्हटले, “पकडा त्याला” मग ज्या हाताने त्याने त्या मनुष्याकडे निर्देश केला होता तो हे बोलत असताना लुळा पडला. त्यास तो हलवता येईना 5तसेच, वेदी भंग पावली. त्यावरील राख जमिनीवर पडली. देवाच्या मनुष्याच्या तोंडून परमेश्वराचे वचन निघत होते याची ती खूण होती. 6तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर.” तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला. 7राजा त्या देवाच्या मनुष्यास म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल, काहीतरी खा मग मी तुला इनाम देईन.” 8पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, “अर्धे राज्य मला देऊ केलेस तरी मी तुझ्याबरोबर घरी येणार नाही. इथे मी अन्नपाणी घेणार नाही. 9काहीही न खाण्यापिण्याबद्दल परमेश्वराने मला बजावले आहे. तसेच, येताना ज्या रस्त्याने आलो त्याने परत जायचे नाही, अशीही त्याची आज्ञा आहे.” 10त्याप्रमाणे तो वेगळ्या रस्त्याला लागला. बेथेलला येताना, ज्या रस्त्याने आला त्याने तो गेला नाही. 11बेथेल नगरात एक वृध्द देवाचा मनुष्य राहत होता. त्याच्या मुलांनी त्यास या संदेष्ट्याने बेथेल मध्ये काय केले ते येऊन सांगितले. राजाला तो संदेष्टा काय म्हणाला तेही त्यांनी सांगितले. 12तेव्हा देवाचा मनुष्य म्हणाला, “कोणत्या रस्त्याने तो परतला?” तेव्हा मुलांनी आपल्या वडिलांना यहूदाच्या संदेष्ट्याचा मार्ग दाखवला. 13त्या वृध्द संदेष्ट्याने “मुलांना गाढवावर खोगीर चढवायला सांगितले.” त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर संदेष्टा गाढवावरुन निघाला. 14हा वृध्द संदेष्टा त्या देवाच्या माणासाच्या मागावर निघाला. तेव्हा तो एला वृक्षाखाली बसलेला आढळला. वृध्द संदेष्ट्याने त्यास विचारले, “तूच का तो यहूदाहून आलेला देवाचा मनुष्य?” संदेष्ट्याने यावर होकार दिला. 15तेव्हा वृध्द संदेष्टा म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आमच्याकडे जेव.” 16पण हा देवाचा मनुष्य म्हणाला, “तुझ्याबरोबर मी येऊ शकणार नाही. तसेच तेथे खाऊपिऊ शकणार नाही. 17तेथे काही खायचे प्यायचे नाही आणि गेलास त्या रस्त्याने परतायचे नाही असे परमेश्वराने मला सांगितले आहे.” 18यावर तो वृध्द संदेष्टा म्हणाला, “मीही तुझ्याप्रमाणेच एक संदेष्टा आहे.” आणि पुढे त्याने खोटे सांगितले, “मला नुकतेच परमेश्वराच्या दूताचे दर्शन झाले. त्याने तुला माझ्या घरी घेऊन यायला आणि खाऊपिऊ घालायला मला सांगितले आहे.” 19तेव्हा तो देवाचा मनुष्य वृध्द संदेष्ट्याच्या घरी गेला आणि तेथे त्याने जेवणखाण केले. 20ते मेजावर बसलेले त्यास परत आणणाऱ्या संदेष्ट्याशी परमेश्वर बोलला. 21वृध्द संदेष्टा या यहूदातील देवाच्या मनुष्यास म्हणाला, “तू परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस, असे परमेश्वर म्हणाला, तू त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस. 22येथे काहीही खायला प्यायला परमेश्वराने तुला सक्त, मनाई केली होती. तरी तू इथे आलास आणि जेवलास. तेव्हा तुझे आता तुझ्या कुटुंबियाबरोबर दफन होणार नाही.” 23या देवाच्या माणासाचे खाणेपिणे झाल्यावर वृध्द संदेष्ट्याने त्याच्या गाढवावर खोगीर घातले आणि हा यहूदाचा संदेष्टा (देवाचा मनुष्य) निघाला. 24परतीच्या वाटेवर एका सिंहाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्यास मारुन टाकले. देवाच्या मनुष्याचा मृतदेह रस्त्यातच पडला होता. गाढव आणि सिंह त्याच्या प्रेताशेजारीच होते. 25इतर वाटसंरुनी ते प्रेत आणि जवळ उभा राहिलेला सिंह हे पाहिले. तेव्हा ती माणसे गावात आली आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली ही घटना वृध्द संदेष्ट्याला सांगितली. 26वृध्द संदेष्ट्याने या देवाच्या मनुष्यास फसवून आणले होते. तेव्हा हे सर्व ऐकून तो म्हणाला, “असा हा देवाचा मनुष्य. त्याने परमेश्वराचे म्हणणे अवमानले नाही. तेव्हा परमेश्वरानेच त्यास मारायला सिंहाच्या स्वाधीन केले असावे. असे होणार हे परमेश्वराने सांगितले होते.” 27मग हा संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्या गाढवावर खोगीर घाला.” मुलांनी त्याचे ऐकले. 28तेव्हा तो निघाला आणि वाटेवरच्या मृतदेहापाशी आला. सिंह आणि गाढव अजूनही तिथेच होते. सिंहाने आपल्या भक्ष्याला तोंड लावले नव्हते की गाढवाला इजा केली नव्हती. 29वृध्द देवाच्या संदेष्ट्याने तो मृतदेह गाढवावर ठेवला आणि मृत्यूबद्दल शोक करायला आणि देहाचे दफन करायला तो गावात आणला. 30त्याने तो आपल्याच घराण्याच्या दफनभूमीत पुरला. त्याच्यासाठी शोक प्रकट केला. तो म्हणाला, “माझ्या भावासारखाच तू मला होतास. मला फार वाईट वाटते.” 31मग त्याने त्याचे दफन केले. आपल्या मुलांना तो म्हणाला, “मी मरण पावल्यावर माझेही याच ठिकाणी दफन करा. माझ्या अस्थी देवाच्या मनुष्या शेजारीच विसावू द्या. 32परमेश्वराने त्याच्या तोंडून वदवलेले सर्व प्रत्यक्षात येईल. बेथेलची वेदी आणि शोमरोनच्या नगरातील उंच देवळांबद्दल त्याने सांगितलेले खरे होईल.” 33राजा यराबामामध्ये काहीही फरक पडला नाही. तो दुष्कृत्ये करतच राहिला. वेगवेगळ्या कुळांमधल्या मनुष्यांची तो याजक म्हणून निवड करत राहिला. हे पूरोहित उंच देवळांमध्ये पूजा करत. ज्याला हवे त्यास याजक बनता येई. 34या गोष्टीने यराबामाच्या घराण्यास पाप लागले व त्यामुळे त्यांचा सर्वनाश झाला. आणि भूतलावरून ते नष्ट झाले.
सध्या निवडलेले:
1 राजे 13: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.